आरोपीच्या नातेवाइकांनी फिर्यादी महिलेला धमकावल्याने अदखलपात्र गुन्हा
भुसावळ- छळ प्रकरणातील महिला आरोपीची अटक टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारणार्या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदार लतिफ शेख यांना जळगाव एसीबीने गुरूवारी अटक केली होती. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. विजय खडसे यांनी युक्तीवाद केला.
आरोपीच्या नातेवाईकांनी धमकावले
लाचखोर हवालदार शेख यांच्या नातेवाईकांनी फिर्यादी महिलेला न्यायालयाच्या आवारात धमकावल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी एसीबीच्या अधिकार्यांनी हवालदार शेख यांना न्यायालयात आणले होते. त्यावेळी शेख यांच्या नातेवाईकांनी फिर्यादी महिलेस न्यायालयाच्या आवारातच धमकावले. आमचा जामीन होऊन जाऊ द्या, मग पाहून घेऊ, असा दम हवालदार शेख यांच्या नातेवाईकांनी फिर्यादीला भरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.