गलवाडेच्या युवकाने दारूच्या नशेत मानेवर केले ब्लेडने वार ; साखरपुडा तुटल्याच्या वैफल्यातून कृत्याचा संशय
भुसावळ- मद्यधूंद अवस्थेत औरंगाबाद जिल्ह्यातील गलवाडेच्या 30 वर्षीय युवकाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात मानेवरच ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. या युवकाचा साखरपुडा तुटल्याने त्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत हे कृत्य केल्याचे समजते. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर घटनेनंतर युवकाला लागलीच पोलिसांनी उपचारार्थ हलवल्याने त्याचे प्राण वाचू शकले.
बाजारपेठ पोलिस ठाण्यात पडला रक्ताचा सडा
आकाश साहेबराव जावरे (वय 30, रा. गलवाडे, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) या युवकाने गुरूवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत मला आत्महत्या करायची आहे, असे सांगत काही कळण्याआतच खिशातून ब्लेड काढून गळ्यावर सपासप वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पोलिस कर्मचार्यांनी तत्काळ त्याच्या मानेवर रुमाल बांधला तर पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी जखमीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याच्या सूचना केल्यानंतरपोलिस कर्मचारी राहुल चौधरी, रवींद्र तायडे यांनी त्यास खाजगी रुग्णालयात हलवले. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जावरे याचा साखरपुडा तुटल्याने त्याने नशेत हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.