भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दोघा कर्मचार्‍यांना अटक

0

मद्यधुंद अवस्थेत मारहाण भोवली ; तक्रारीची गांभीर्याने दखल

भुसावळ- मद्यधूंद अवस्थेत जीम चालकास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश माळी व शशी तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी पोलिसांची नावे आहेत.

मद्यधूंद अवस्थेतील ‘दबंगगिरी’ भोवली
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे हे दोन्ही कर्मचारी मद्य प्राशन करून दुचाकीने रेल्वे स्थानकाजवळील दर्ग्याजवळ आल्यानंतर तेथे जीम चालक तथा तक्रारदार जुबेरखान नईम खान पठाण (33, ग्रीन पार्क, भुसावळ) हा उभा असताना आरोपींनी त्यांची दुचाकी पठाण यांच्या पायाजवळ नेत पुढील चाकाचा धक्का दिल्याची घटना 7 रोजी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास घडली. यानंतर पठाण यांनी ‘क्यू मारा भाई’ असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी पोलिसाने दिखता नही क्या, हम पुलिस है, असे सांगत दुचाकीखाली उतरून पठाण यांच्या डाव्या व उजव्या कानात फाईट मारल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यानंतर आरोपी पोलिसांनी ‘तेरेको क्या करना है करले, जिसको बुलाना है बुला’ असे सांगत अश्‍लील शब्दात शिवीगाळ केली व घटनास्थळावरून काढता पाय घेतला. घटनास्थळी सरफराज खान व आमीन खान हे तक्रारदाराचे दोन्ही मित्र होते. त्यांनी या घटनेचे व्हिडिओचित्रीकरण केले तर या घटनेनंतर पठाण यांनी जिल्हा रुग्णालयात जावून उपचार घेतले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना घटनेची माहिती दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात बाजारपेठ पोलिसांनी जावून तक्रारदाराचा जवाब नोंदवत मध्यरात्री पठाण यांच्या फिर्यादीनुसार दोघाही संशयीत आरोपी पोलिसांविरुद्ध भादंवि 324, 323, 504, 506, 294, 279, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दोघाही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही -देविदास पवार
कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. जो कुणी कायदा हातात घेईल त्याच्यावर आपण निश्‍चित कारवाई करणार असल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार म्हणाले. संबंधित दोषी कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव आपण वरीष्ठ स्तरावर सादर केला असून नियमानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ
बाजारपेठ डीबीतील योगेश माळी व बाजारपेठ पोलिस ठाण्यात जनरल ड्युटी करणार्‍या शशीकांत तायडे यांच्याविरुद्धच पोलिस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. रात्री रेल्वे स्थानकाबाहेर घडलेल्या घटनेचा व्हिडिओदेखील अनेकांनी काढला, त्यात पोलिस कर्मचारी दबंगगिरी करीत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.