भुसावळ बोगस शिधापत्रिकेच्या मुद्द्यावरून दांगडो

0

मुंबई (निलेश झालटे) : भुसावळ तालुक्यातील बोगस शिधापत्रिका आणि रेशन दुकानांचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला चांगलाच गाजला. तीनदा हा प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्याने आ. संजय सावकारे यांच्यासह अन्य सदस्यांनी राज्यमंत्र्यांना फैलावर घेतल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि निर्णय देण्यासाठी स्वतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जळगावला येण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रश्न उपस्थित केलेल्या सर्व आमदारांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पुढच्या आठवड्यात लावली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. रेशन अनियमितता प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून दोषी अधिकाऱ्यांवर दोषारोप सिद्ध झाले आहेत. सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देखील राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

उपाध्यायची सेटिंग मंत्रालयापासून :- आ. संजय सावकारे
भुसावळ तालुक्यात 11 दुकाने उपाध्याय नामक एकच व्यक्ती चालवीत असून या व्यक्तीला मंत्रालयापासून वाचविले जात असल्याची टीका आ. संजय सावकारे यांनी या प्रश्नोत्तराच्या दरम्यान केली. सावकारे म्हणाले की, हा विषय आतापर्यंत तीन वेळेस दोन्ही सभागृहात उपस्थित केला जाऊन अद्याप चौकशी पूर्ण होत नाही. 11 दुकाने एकट्याच्या नावावर असून त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही मात्र बाकीच्या 9 दुकानदारांची विनाकारण चौकशी लावली जाते असे असे सांगत त्याच्यावर आणि अनियमिततेत दोषी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न सावकारे यांनी उपस्थित केला. यावर पुढच्या आठवड्यात बैठक लावून सदर व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले.

प्रकरणाची गुंतागुंत वाढली, बापट स्वतः येणार
या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ झाला. भुसावळ येथील बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यासंबंधी प्रश्न डॉ. संजय रायमूलकर यांनी उपस्थित केला होता. सावकारे यांनी या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, हा शासनाचा उलटा कारभार आहे. अनियमितता असल्यास कारवाई करावी मात्र आधीच तिथे दुकाने कमी आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्थाही निर्माण करण्याची विनंती करत दोषींवर कारवाईची मागणी केली. या दरम्यान आशिष शेलार, संजय रायमूलकर तसेच अन्य सदस्यांकडून प्रश्नांची सरबत्ती येऊ लागल्यावर स्वतः ना. बापट यांनी या प्रकरणात जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करून चौकशी करत कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच पुढच्या महिन्यात स्वतः जळगावला येऊन मिटिंग करून निर्णय देण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.

अधिकऱ्यांसह अनेकजण रडारवर
या प्रकरणात 9 रास्त भाव दुकानदारासह जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे, पुरवठा अधिकारी एम.के . हिंगे या अधिकाऱ्यांसह 11 दुकाने स्वतःच्या नावे चालविणाऱ्या उपाध्याय यांसह अनेकजण रडारवर आहेत. दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई तसेच संबंधित दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आश्वासन ना. बापट यांनी विधानसभेत दिले.