भुसावळ भरधाव टँकर एस.टी.बसवर आदळला ; प्रवासी बचावले मात्र बसचे नुकसान

0

राष्ट्रीय महामार्गावरील भल्या पहाटेची घटना ; शहर पोलिसांनी घेतली अपघाताची नोंद

भुसावळ- ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव टँकवर बसवर आदळल्याची घटना सोमवारी पहाटे साडेसहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील कुशल ऑफसेटसमोर घडली. या अपघातात सुदैवाने प्रवासी बचावले असून बसचे मात्र मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बराचवेळ वाहतूक विस्कळीत झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

भरधाव टँकर आदळला बसवर
मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बस (एम.एच.14 बी.टी.3888) मुक्ताईनगरहून जळगावकडे जात असताना महामार्गावरील कुशल ऑफसेटजवळ भरधाव जळगावकडे जाणारा टँकर (एम.एच.48 ए.वाय.4066) पाठीमागून धडकला. अचानक जोरदार धडक बसल्याने प्रवासी हादरले मात्र सुदैवानेही कुणीही जखमी झाले नाही तर बसचा मागील पत्र्याचे मात्र मोठे नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने भुसावळ शहर पोलिसांसह स्थानिक आगारप्रमुखांना माहिती कळवल्यांतर एच.एम.भोई, वाहतूक नियंत्रक डी.एम.भोई यांनी अपघातस्थळी धाव घेतली. शहर पोलिसांनी अपघाताबाबत नोंद घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.