भुसावळ-भादलीदरम्यानच्या थर्ड लाईनची चाचणी यशस्वी

0

भादली-भुसावळ दरम्यान ताशी 130 वेगाने धावली स्पेशल निरीक्षण ट्रेन ; मोटार ट्रॉलिद्वारे निरीक्षण ; तिसर्‍या रेल्वे लाईनचा पहिला टप्पा पूर्ण ; पुढच्या टप्प्यात भादली ते जळगावचे काम

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ ते भादली दरम्यानच्या 12 किलोमीटर अंतराच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे मोटार ट्रॉलीद्वारे मंगळवारी सकाळी मुख्य सुरक्षा आयुक्त ए.जे.जैन यांनी निरीक्षण केले तर परतीच्या प्रवासात ताशी 130 वेगाने स्पेशल निरीक्षण ट्रेनही चालवण्यात आली. भविष्यात या मार्गावरून ताशी 110 ऐवजी 130 वेगाने गाडी चालवण्याचे रेल्वे प्रशासनाने नियोजन आहे तर चाचणी यशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात आता भादली ते जळगावदरम्यान काम पूर्ण करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल आहे.

मोटार ट्रॉलीद्वारे केले निरीक्षण
डेप्युटी कमिश्‍नर रेल्वे सेप्टी.ए.के.जैन, डीआरएम आर.के.यादव, उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित थवरे, वरीष्ठ मंडल परीचालन प्रबंधक स्वप्नील निला, वरीष्ठ मंडल विद्युत अभियंता जी.के.लकेरा, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल आदींच्या उपस्थितीत मंगळवारी भुसावळ ते भादली दरम्यान मोटार ट्रॉलीद्वारे निरीक्षण केले. ठिकठिकाणी जैन यांनी मोटार ट्रॉली थांबवून माहिती जाणून घेतली तसेच परतीच्या प्रवासात स्पेशल निरीक्षण ट्रेनचे ताशी 130 वेगाने चाचणीदेखील यशस्वी पार पडली. भुसावळ ते जळगाव 24.13 किमी अंतराच्या तिसर्‍या लाईनीचे पहिल्या टप्यातील काम रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण झाले असून आता भादली ते जळगावदरम्यान काम प्रगतीपथावर आहे.

वाहतुकीचा लोड होणार कमी
भुसावळ ते जळगाव दरम्यान वाहतुकीचा लोड असल्याने अनेकदा गाड्यांना यार्डात वा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येते मात्र थर्ड लाईनमुळे या मार्गावरील लोड कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार असून यामुळे प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा टळून रेल्वे गाड्या नियमित धावण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुख्य सेफ्टी आयुक्तांसह पाच जणांच्या टीमने मोटार ट्रॉलीत बसून निरीक्षण केले तर नवीन रेल्वे लाईनीची पूजा करण्यात आली तर डीआरएम यांनी श्रीफळ वाढवून तिसर्‍या लाईनीच्या निरीक्षण कामाचा शुभारंभ केला.

एक सेक्शन पूर्ण -डीआरएम
भुसावळ ते भादलीदरम्यानच्या तिसर्‍या लाईनची मंगळवारी चाचणी यशस्वी झाली. मुख्य सुरक्षा आयुक्तांनी मोटार ट्रॉलीद्वारे जागोजागी थांबून निरीक्षण केले तर भादली ते भुसावळ दरम्यान ताशी 130 वेगाची चाचणी घेण्यात आल्याचे डीआरएम आर.के.यादव म्हणाले. दुसर्‍या टप्प्यात भादली ते जळगावदरम्यानचे काम पूर्ण करायचे असून रेल्वे यार्डातही कामे सुरू असल्याचे ते म्हणाले.