भुसावळ मतदारसंघातील डीपीआर प्लॅन तयार होणार

0

आमदार संजय सावकारे यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश

भुसावळ- तालुक्यासाठी डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रिव्हाईज डेव्हपमेंट प्लॅन) तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सकारात्मक दर्शवली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आल आहे. गुरूवारी आमदारांनी पुण्याच्या अभियांत्रिकीमधील संचालक डॉ.आहुजा यांची भेट घेत चर्चा केली. 15 जुलैनंतर सर्वे होणार असल्याचे सांगण्यात आले.

नगरपालिकेची होणार महानगरपालिका
भविष्याचा विचार करून आगामी काळामध्ये भुसावळ शहर जिल्हा होण्याच्या वाटचालीकडे कुच करीत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आताची ‘अ’ नगरपालिका भविष्यात महानगरपालिका होणार आहे. त्याकरीता शहरासह तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी आमदारांची धडपड सुरू आहे. त्या माध्यमातून दूरदृष्टीकोन ठेवून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे गेल्या दोन वर्षांपासून शहरासह तालुक्याचा डीपीआर (डेव्हलपमेंट प्राजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रिव्हाईज डेव्हपमेंट प्लॅन) तयार करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता.

काय असणार ‘डीपीआर’मध्ये ?
शहरात काँक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटारी, भूमिगत केबल, कचरा संकलन, रेन वॉटर हार्व्हेस्टींग, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफीस यांच्या जागांबाबत नकाशे तयार करणे जेणेकरुन भविष्यात अडचण निर्माण होवू नये. प्रभागनिहाय विकासात्मक योजना तयार करणे, तापी नदीकाठाचा बगीचासह आधुनिकपणे विकास करणे. तालुक्याच्या ग्रामीण भागांच्या गावांना गाव जोडणारे रस्ते, लहान लहान भूखंडांची तपासणी, सहकाराच्या माध्यमातून शेतीला पूरक सर्व योजना अशा परीपूर्ण ग्रामीण भागांच्या नागरीकांसाठी या डीपीआरमध्ये समावेश असेल.

जुलैनंतर होणार शहराचा सर्वे -आमदार सावकारे
शहर व तालुक्याचा डीपीआर तयार करण्यासंदर्भात यापूर्वीच आपण संबंधिताना पत्र दिले होते तसेच त्यानंतर नगरपालिकेकडून रीतसर ठरावदेखील करण्यात आला. गुरुवारी संचालकांची भेट घेवून त्यांना शहर व तालुक्याचा सर्वे करण्याची विनंती केली. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या देखरेखीखाली सर्वे होणार असून जुलै महिन्यानंतर संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी पाहणी करतील व त्यानंतर कामकाजाची रूपरेषा ठरवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.