भुसावळ– कत्तकत्त्याहून भिवंडी येथे सूत (दोर्याचे रील) घेऊन निघालेल्या आयशर ट्रकला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अचानक आग लागल्याने वाहनासह लाखो रुपये किंमतीचे सूत जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवोदय साकेगाव गुरूकुलसमोर घडली. या प्रकाराने महामार्ग काही वेळेसाठी ठप्प झाला होता. शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय
कलकत्ता शहरातून भिवंडी शहराकडे सूत घेऊन निघालेला आयशर ट्रक (एम.एच.12 एल.टी.3064) ला शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. साकेगाव गुरूकुलजवळ ही घटना घटनाल्यानंतर रीपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी चालक परमानंद विनोद ठाकूर (48, टीनोपाली, कलकत्ता) यांना आगीची माहिती दिल्यानंतर त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. पाहता-पाहता संपूर्ण वाहनाने पेट घेतला. काही वेळात अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनासह लाखो रुपयांचे सूत तो पर्यंत जळाल्याचे सांगण्यात आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय आहे. आगीनंतर सतर्कता म्हणून वाहनधारकांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याने दूरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. कंपनीचे मालक आल्यानंतर या संदर्भात रीतसर नुकसानीचा आकडा सांगता येईल, असे चालकाने सांगितले.