भुसावळ मुख्याधिकार्‍यांना अटक न झाल्यास उद्यापासून आंदोलन

0

माजी आमदार संतोष चौधरींचा इशारा ; गहाळ फाईलीचा शोध घेण्याची मागणी

भुसावळ- शेतजमीन एन.ए.करण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह सात जणांनी तीन लाखांची खंडणी मागितली तर ती न दिल्याने आपली फाईलच पालिकेतून लांबवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांनी केला होता. शहर पोलिसांकडून या तक्रारीचा तपास सुरू असताना चौधरी यांनी मंगळवारी भुसावळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देऊन मुख्याधिकार्‍यांच्या निलंबनासह त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास 30 मे पासून प्रांत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. चौधरी यांच्या पावित्र्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बेकायदेशीर कामे थांबवण्याची मागणी
माजी आमदार चौधरी यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगरपालिका सेवानिवृत्त अभियंता अनिल भागवत चौधरी, नगरपालिकेचे अभियंता प्रवीण जोंधळे, अभियंता पंकज पन्हाळे, नगरपालिका कर्मचारी राजू नटकर, विजयसिंग चव्हाण, लेखापाल अख्तरखान युनूसखान यांच्याविरुद्ध त्यांनी शहर पोलिसांकडे फाईल गहाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे मात्र संबंधितावर अद्यापपर्यंत फौजदारी कारवाई झालेली नाही. 31 मे रोजी मुख्याधिकारी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या काळात शहरात अनेक बेकायदेशीर कामे सुरू असून ते थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकार्‍यांना निलंबित करून त्यांना अटक करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली असून ही मागणी पूर्ण न झाल्यास 30 मे पासून प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आपल्यावरील आरोप बिनबुडाचे -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले की, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.