भुसावळ-यावल आगारातून पंढरपूरसाठी विशेष बस सेवा

0

भाविकांनी बससेवेचा लाभ घेण्याचे आगारप्रमुखांचे आवाहन

भुसावळ- पंढरपूरातील आपल्या लाडक्या विठोबा रायाच्या दर्शनासाठी खान्देशातील भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात ओढ निर्माण होते. यामुळे राज्य परीवहन महामंडळाच्या माध्यमातून भाविकांचा प्रवास सुखकर व सोयीस्कर व्हावा यासाठी आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ व यावल आगाराने पंढरपूरसाठी जादा विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.

यावल आगारातून दोन जादा बसेस
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील आपल्या लाडक्या विठोबा रायाच्या दर्शनाची भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात ओढ निर्माण होते. यामध्ये खान्देशातील भाविकांची संख्या नगण्य असल्याने रेल्वे प्रशासनाने दोन जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्य परीवहन महामंडळानेही विठोबारायांच्या भाविकांचा प्रवास सुखकर, सोयीस्कर व सुरक्षीत व्हावा यासाठी राज्यभरातील आगारातून जादा विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार भुसावळ व यावल आगारानेही वरीष्ठांच्या आदेशानुसार जादा दोन विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जादा भाविकांच्या मागणीनुसार थेट गावातूनही बससेवा पुरवली जाणार आहे तसेच बसस्थानकावर आरक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली असून भाविकांनी या जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.

असे आहे बस आगाराचे नियोजन
भुसावळ आगार- भुसावळ आगारातून 12 जूलैपासून सकाळी 6.30 व 8.30 वाजेदरम्यान अशा दोन बसेस सोडल्या जाणार आहेत तर यावल आगारातून सकाळी सात वाजता एक बस पंढरपूरसाठी रवाना केली जाणार आहे. ही बस सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथे पोहचणार आहे. जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी पंढरपूर येथे जिल्हानिहाय तात्पुरते बसेसचे वाहनतळ तयार करण्यात येणार आहे.

पासेस व विम्याची सुविधा
बस आगाराने भाविकांना कमी गर्दीच्या हंगामामुळे अल्पशा दरात चार व सात दिवसासाठी पासेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पासेसच्या कालावधीत भाविकांना महाराष्ट्रात कुठल्याही धार्मिक व पर्यटनस्थळी जाण्याची सुविधा आहे तसेच भाविकांच्या सुरक्षीत प्रवासाची हमी देत राज्य परीवहन महामंडळाकडून 10 लाख रूपयाच्या विम्याचीही तरतूद केली आहे.पंढरपूरातुन भाविकांचा परतीचा प्रवासही सुखकर व्हावा यासाठी आगाराने नियोजन केले आहे.

थेट गावातून बससेवा
तालुक्यातील एखाद्या गावातील 40 किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने भाविकांनी मागणी केल्यास थेट गावातून बससेवा पुरवली जाणार आहे. यामुळे भुसावळ आगारप्रमुख एच.एम.भोई व यावल आगारप्रमुख डी.जी.बंजारा यांनी भाविकांनी परीवहन महामंडळाच्या या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.