भुसावळ येथील”समर” समूहाच्या उपग्रहाचे पहिल्या स्वनिर्मित हायब्रीड रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण
जागतिक विक्रम; भारताचे स्वप्न पूर्तीसाठी एक पाऊल
भुसावळ प्रतिनिधी :- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट नॉन व्हेईकल मिशन 2023 अंतर्गत भुसावळ येथील अंतराळ क्षेत्रातील अग्रेसर अशा नितीन पाटील यांच्या “समर” समूहाने अंतराळ क्षेत्रात जागतिक विक्रमाकडे वाटचाल केली आहे. जगातील सर्वात मोठ्या मिशन अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांचा समूहाने 150 पिको उपग्रह अवकाशात यशस्वी प्रक्षेपित केले. हे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी पुन्हा उपयोगात येणाऱ्या हायब्रीड रॉकेट वापर करण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारताचे स्वप्न पूर्तीसाठी एक पाऊल समजले जात आहे.
या जागतिक विक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 2020 व 21 मधील “पे लोड क्यूब चॅलेंज” प्रकल्पाचा या पुढील भाग होता. या प्रकल्पात विद्यार्थ्यांना उपग्रह बनवण्याचे प्रशिक्षण तसेच उपग्रह प्रक्षेपित करणारे व परत वापरात येणारे रॉकेट बनवण्याची संधी उपलब्ध झाली होती.
या प्रकल्पात नितीन पाटील, अभिषेक पाटील, नेत्रज चौधरी, अर्णव पाटील, रिद्धेश चौधरी, समीक्षा पाटील यांनी सहभाग घेतला होता.
प्रक्षेपणासाठी सर्वप्रथम वापरले हायब्रीड रॉकेट :-
या रॉकेटचे वजन 22.5 kg होते. तर उपग्रह लोड केल्यानंतर रॉकेटचे वजन 45 ते 60 किलोग्रॅम होते.
हे रॉकेट 19 फेब्रुवारी 2023 रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुरम येथून अवकाशात सोडण्यात आले. याआधी असा प्रकल्प अमेरिकेत इलोन मस्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी 150 उपग्रह सोबत बनवून असे रॉकेट बनविण्याचा पहिलाच प्रयोग असल्याने हा जागतिक विक्रम, आशिया विक्रम तसेच वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम असा आहे. या मोहिमे अंतर्गत भारतीय विद्यार्थी व भुसावळ येथील समर ग्रुप ने अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवले आहे.
असा होता समर ग्रुप विद्यार्थ्यांचा सहभाग :-
उपग्रहाच्या मांडणीसाठी लागणारे रिसर्च क्यूब तयार करून त्यामधील पेलोडची मांडणी करण्यात आली आहे.
हायब्रीड रॉकेटची रचना व निर्मिती ही स्वतः विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांच्या मदतीने केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना फक्त उपग्रह तंत्रज्ञान याबद्दल माहिती मिळालेली नसून या सोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजीनियरिंग, गणित तसेच संगणक प्रोग्रामिंगचे ज्ञान मिळाले आहे.
यशस्वी मोहिमेची उपयुक्तता :-
प्रक्षेपित उपग्रहांद्वारे हवामानाचा अंदाज, वातावरणीय संकल्पना आणि वेगवेगळ्या प्रारणांचा अभ्यास होईल, असे पेलोड वापरले गेले आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023* या अंतर्गत देशभरातून 5000 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये 100 पेक्षा जास्त शासकीय विद्यालयांनी सुद्धा सहभाग घेतला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाइन प्रणाली द्वारे प्रशिक्षित केले गेले. त्यानंतर प्रत्यक्ष कृती व संशोधन मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना मोहिमेतील प्रत्येक घटकाविषयी प्रशिक्षित केले गेले. याद्वारे विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष काम करण्याची बहुमूल्य संधी मिळाली. या मोहिमेअंतर्गत समाजातील प्रत्येक थरातील विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे संशोधनात्मक वृत्तीने पाहण्याची दृष्टी मिळाली. संशोधनातून मानवी जीवन सुकर करीत असताना भावी आयुष्यात नवनवीन शास्त्रज्ञ घडून येतील, असा विश्वास आहे. त्या दृष्टीने ही मोहीम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असून पुढील संशोधनाची नांदी आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन :-
या प्रकल्पा अंतर्गत उपग्रह निर्मिती साठी लागणारे सुटे भागांची बांधणी व सॉफ्टवेअर कोडींग आणि अपलोडिंग इतर मार्गदर्शन समर समूहाचे प्रकल्प प्रमुख नितीन पाटील यांनी केले. यासाठी फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांचे मोहिमेस मार्गदर्शन लाभले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम, मार्टिन फाउंडेशन, स्पेस झोन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स या संस्थांचे संशोधन लाभले.
यातूनच विद्यार्थ्यांना स्पेस विज्ञान या क्षेत्रातील विविध उपयोगिता व संशोधनात्मक क्षेत्र याविषयी सखोल माहिती मिळाली. तसेच या क्षेत्रात उपलब्ध संधी त्याची आजच्या काळाला असणारी गरज ही विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. यासोबतच भारत हा हायब्रीड रॉकेट व उपग्रह या खाजगी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारा महत्त्वपूर्ण देश आहे. अशा यशस्वी मोहिमेतूनच भारत या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून समोर आलेला आहे. समर संस्थेच्या च्या यशस्वी उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण या मोहिमेची यशस्वीता व परिश्रम हे सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे मत समर उपग्रह निर्मिती मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक नितीन पाटील यांनी व्यक्त केले.