भुसावळ रेल्वेस्थानकात प्रवाशांचा सव्वा तास गोंधळ

0

समर एक्सप्रेसची वातानुकूलित यंत्रणा बंद ; रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांनाही धक्काबुक्की

भुसावळ- इलाहाबाद येथून मुंबईला निघालेल्या समर एक्सप्रेसची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी सुमारे सव्वा तास गाडी वारंवार साखळी ओढून थांबवत चांगलाच गोंधळ घातला. यात आरपीएफ विभागाच्या दोन कर्मचार्‍यांशीही वाद घालण्यात आल्याची घटना 28 रोजी दुपारी घडली.

रेल्वेतील वातानुकूलित यंत्रणा होती बंद
इलाहाबाद येथून मुंबईकडे निघालेली गाडी क्र.04115 सकाळी 6-45 वाजता येणारी ही गाडी दुपारी 1-25 वाजता उशिराने भुसावळ स्थानकावर पोहोचली.इलाहाबाद येथूनच या गाडीची एसी यंत्रणा बंद होती. संतप्त झालेले प्रवासी गाडी फलाट क्र.3 वर येताच उप स्थानक व्यवस्थापक (वाणिज्य)अनिल खरारे यांच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.व्यवस्थापक मनोज श्रीवास्तव व अनिल खरारे यांनी तात्काळ दखल घेत वातानुकूलित यंत्रणा दुरुस्ती करणार्‍या कर्मचार्‍यांना बोलवून दुरुस्तीच्या कामात सुरुवात झाली व गाडीला उशीर होऊ नये म्हणून काही यंत्रणा दुरुस्तीसाठी सोबत कर्मचारी पाठवण्याचे सांगितले. मात्र प्रवाशांनी त्यास स्पष्ट नकार दिला.रेल्वेस्थानकावर गोंधळ वाढतच असल्याने प्रशासनाने तात्काळ आरपीएफ विभागाला सूचना दिली. उपनिरीक्षक लवकुश वर्मा, एएसआय एम.के.व्यवहारे व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत प्रवासी चांगलेच आक्रमक झाले होते. सोबतच विविध मागण्यांसाठी गोंधळ घालत त्यांनी सुमारे 5 वेळा साखळी ओढून गाडी चालू दिली नाही. आरपीएफ विभागाने काही प्रमाणात बळाचा उपयोग करून गोंधळ घालणार्‍या तीन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर गोंधळ कमी झाला. सुमारे 1 तास 10 मिनिटे गाडीचा खोळंबा होऊन 2-45 वाजता ही गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. शेवटी गाडी सुटण्याअगोदर गोंधळ घालणार्‍या प्रवाशाच्या परीवाराचा विचार करून तिघांना सोडून दिले. या गोंधळात उपनिरीक्षक लवकुश वर्मा व एम. के. व्यवहारे यांना धक्काबुक्की करण्यात आली मात्र रेल्वे सुरक्षा बलाने या प्रकाराचा निषेध केला.