भुसावळ : कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरलेली ऑक्सीजन एक्स्प्रेस 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान आठ वेळा धावली असून एका ऑक्सिजन एक्सप्रेसने भुसावळ मंडळातील नाशिक स्टेशनवर चार ऑक्सिजन टँकर्स (65.29 टन ऑक्सिजन) चा पुरवठा केला. मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून टँकर्स यशस्वीरीत्या उतरविण्यात आले. प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करत व अडचणींवर मात करत, देशभर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचे काम भारतीय रेल्वेकडून अविरत सुरू आहे.
नाशिक स्थानकावर चार टँकर्स प्राणवायुचा पुरवठा
भारतीय रेल्वे कोविडच्या विषम परीस्थितीत देशातील कोरोना रुग्णांना लाभदायी ठरलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी द्रव ऑक्सिजनने भरलेले टँकर वाहून नेले जात आहे. भुसावळ विभागातून 24 एप्रिल रोजी नाशिक रेल्वे स्थानकावर विशाखापटनम येथून चार ऑक्सिजन टँकर असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आल्यानंतर ते यशस्वीतेरीत्या उतरवण्यात आले.
अधिकारी म्हणाले ; देशसेवेसाठी कामात आल्याचा आनंद
नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आर.के.कुठार म्हणाले की, आम्ही रेल सेवक कोरोना महामारीच्या काळात देश सेवा करण्यासाठी मागे नसल्याचा आनंद आहे. मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा म्हणाले की, ऑक्सिजन ट्रेनकरीता काम करणे खूप सुखद अनुभव होता आणि नागरिकाना ऑक्सिजन पुरवठा करून जिवंत ठेवण्यासाठी काम करणे ही एक मोठी संधी होती. लोको पायलट वि.के.मीना म्हणाले की, ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांना वेगाने व सुरळीतपणे प्रवास करता येण्यासाठी रेल्वे रूळ खुले ठेवले जात असून अतिशय काटेकोरपणे नियोजन करून विशेष सावधगिरी बाळगली जात आहे.