भुसावळ रेल्वे स्थानकात अतिरेकी शिरतात तेव्हा !

भुसावळातील पोलिस प्रशासन सतर्कतेत पास : मॉकड्रीलनंतर प्रवाशांचा सुटकेचा श्वास

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकात तीन दशहतवादी शिरल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळताच यंत्रणा अलर्ट झाली. अवघ्या काही क्षणात पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका, अग्निशमन दल व लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची यंत्रणाही दिमतीला धावून आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रशिक्षीत कमांडो टीमला सूचना करताच यंत्रणा कामाला लागली व काहीच वेळात एका अतिरेक्याचा खात्मा (अ‍ॅक्शन) व दोघांना ताब्यात घेवून यंत्रणा बाहेर पडली. रेल्वे स्थानकावर अतिरेकी शिरल्याची माहिती प्रवाशांसह उपस्थितांना कळताच त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला मात्र प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांची कामगिरी तपासण्यासाठी हे मॉकड्रील असल्याचे कळताच प्रत्येकाने सुटकेचा श्वास घेतला.

पोलिस यंत्रणेची धाव
जंक्शन स्थानकावर एका खोलीत तीन अतिरेकी शिरल्याची माहिती पोलिस प्रशासनाने शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता कळताच पोलिस दलात खळबळ उडाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, परीवेक्षाधीन सहा.पोलिस अधीक्षक आतीश कांबळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक, जीआरपी व आरपीएफ यांचे अधिकारी धावून आले. क्युआरटी पोलिस पथक, आरसीपी प्लॉटून पथक, श्वान पथकासह स्थानिक पोलिस व अधिकारीही मोहिमेसाठी सज्ज झाले.

मॉक ड्रील कळताच भांड्यात पडला जीव
जंक्शनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा पाहून प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली व नेमके काय झाले कोणालाही काही कळत नव्हते मात्र अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली. अतिरेक्यांनी आश्रय घेतलेल्या रूममध्ये जवानांनी शिरत गोळीबार केला (फक्त अ‍ॅक्शन) त्यात एक अतिरेकी मरण पावला. तर दोन जणांना ताब्यात घेत जवानांनी बाहेर आणले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या सतर्कतेला सॅल्यूट करीत दाद दिली. सकाळी 9.15 ते 10.30 यावेळात मॉकड्रील पार पडले.

कर्मचारी सतर्कतेत पास : पोलिस उपअधीक्षक
जंक्शन शहरात पोलिस यंत्रणा अलर्ट असणे गरजेचे आहे व यंत्रणेचा अलर्टनेस तपासण्यासाठी शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनंतर मॉक ड्रील घेण्यात आले. मॉक ड्रीलच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांमधील तत्परता पाहण्यात आली, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.