भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ तालुक्यातील मुसाळतांडा व भिलमळी हे आदिवासी वस्ती असलेले तांडे दत्तक घेतले आहे. दरवर्षी शालेय साहित्य, दिवाळी फराळ, ग्रामस्थांसाठी विविध आरोग्य शिबिर, सोयी-सुविधा येथे पुरवल्या आहेत तर आता कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उद्योगधंदे ठपप असून हातावर पोट भरणार्यांना अधिक हाल सोसावे लागत आहे. गावातील सर्व आदिवासी बांधव ज्यांची केवळ मजुरीवर गुजराण आहे, अशांची मदत करणे आपले कर्तव्य समजून क्लबच्या सदस्यांनी या गावांना प्रत्यक्ष भेट देवून ग्रामस्थांची गरज लक्षात घेत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
गहू आणि तांदूळ स्वस्त धान्य दुकानात मिळाल्याने तूरदाळ, तेल, साखर, तिखट, मीठ, गरम मसाला, बेसन, कांदे, बटाटे, अंघोळीसह कपड्यांचा साबण, टुथपेस्ट आदी साहित्य प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. सर्व रोटेरीयन सदस्यांनी त्यासाठी आर्थिक हातभार लावला. रो.मकरंद चांदवडकर यांनी सर्व टुथपेस्टसाठी हातभार लावला तसेच ज्येष्ठ आमदार संजय सावकारे यांनी भरीव मदत दिली. शुक्रवार, 10 रोजी भुसावळ तहसीलदारांची रीतसर परवानगी काढल्यानंतर कोरोनाबाबत सर्व आवश्यक खबरदारी घेऊन या शिधा सामग्रीचे वाटप करण्यात आले. याकामी मुसाळतांडा जि.प.शाळेचे शिक्षक दीपक सुरवाडे यांची मोलाची मदत झाली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सोनू (महेंद्र) मांडे, अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार व सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.