भुसावळ लोहमार्गच्या हवालदाराचे निलंबन

0

खंडव्यातील लाकूड व्यापार्‍याला गंडवण्याचे प्रकरण अंगाशी ; आधी दरोडा नंतर लुटीचा दाखल झाला होता गुन्हा ; आरोपी हवालदाराला होणार अटक
; लुटीतील पाच लाखांपैकी साडेतीन लाखांची हस्तगत ; उर्वरीत दिड लाखांच्या रकमेचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

भुसावळ- खंडव्याच्या लाकूड व्यापार्‍याला शस्त्रांचा धाक दाखवत त्याच्याकडील पाच लाखांची रक्कम हिसकावून महामार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी गत एप्रिल महिन्यात बुधवार, 17 रोजी पहाटे महामार्गावरील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली होती. या दरोडेखोरांच्या दोघा साथीदारांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर 16 रोजी रात्री खंडव्याच्या व्यापार्‍याला लुटताना घटनास्थळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचा हवालदार रवींद्र उर्फ बबलू पाटील हादेखील तेथे उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाल्याने या गुन्ह्यात त्याचाही सहभाग असल्याचे गृहीत धरून बाजारपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध स्वतंत्र दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी हवालदाराविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. लोहमार्गचे पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी हवालदार रवींद्र पाटील यांना नुकतेच निलंबीत केल्याने लोहमार्ग पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी हवालदारास लवकरच अटक करण्यात येणार असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले तर लाकूड व्यापार्‍याकडील पाच लाखांपैकी साडेतीन लाखांची रक्कम जप्त असल्याने उर्वरीत दिड लाखांची रक्कम गेली कुठे? याचे उत्तर यंत्रणेला न्यायालयात द्यावे लागणार आहे.

दरोड्याच्या संशयावरून दाखल झाला होता गुन्हा
खंडव्याचा लाकूड व्यापारी शंकर बिरबल पासी (लंकड बाजार, खंडवा) यांच्याकडील पाच लाखांची रोकड लुटून 16 रोजी संशयीत आरोपी डिगंबर वासुदेव कुचके (42, रा.हाथा, ता.बाळापुर, जि.अकोला), संतोष सुकलाल करमा (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), दिलीपसिंग नथ्थुसिंग चव्हाण (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), नारायणसिंग गोकुळसिंग राजपूत (44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, (म.प्र.), नाना जगन सोनी (37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), नंदलाल हरीप्रसाद विश्वकर्मा (46, रा.खडका, ता.भुसावळ), शेषराव पांडुरंग राठोड (47, रा.शिरसोली, ता.तेल्हारा, जि.अकोला), अकबर उस्मान तंबोली (35, रा.बिंदिया नगर, खडका, ता.भुसावळ) हे पसार झाले होते. बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शहरात आरोपींचा शोध घेतल्यानंतर महामार्गावरील एका हॉटेलात आरोपी जेवण करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आठही आरोपींच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड, मिरची पूड, एक लाख रुपये किंमतीची चारचाकी इंडिका (एम.पी.10 सी.ए.2083) तसेच तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा व्हेरीटो (एम.एच.30 ए.एफ.4902, एक चाकु व दोन सुरे, लोखंडी पकड, स्क्रू ड्रायव्हर, सुती दोरीचे बंडल, 21 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल असा सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करीत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

हवालदारासह तिघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा
दरोडेखोरांच्या चौकशीत दोघा आरोपींसह लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हवालदाराच्या उपस्थितीत लाकूड व्यापारी पासी यास लुटल्याची बाब सीसीटीव्हीत समोर आल्याने तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करीत तो तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला होता. आठ दरोडेखोरांपैकी नारायणसिंग गोकुळसिंग राजपूत (44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, (म.प्र.) व नाना जगन सोनी (37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.) यांच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील सनावद येथे अशाच पद्धत्तीने फसवणुकीचे गुन्हा दाखल असल्याची माहितीही पुढे आली होती.

‘त्या’ हवालदाराचे निलंबन, लवकरच होणार अटक
लाकूड व्यापारी पासी यांना लुटल्या प्रकरणात हवालदार बबलू पाटील याचाही सहभाग असल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाल्याने त्यास लोहमार्ग पोलिस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे शिवाय त्यास लवकरच अटक करण्यात येणार असून गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकरच लोहमार्ग पोलिसांकडून न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्यातील तक्रारदार तसेच निलंबीत हवालदार बबलू पाटील यांच्यात संभाषण झाल्याचा सीडीआरदेखील लोहमार्ग पोलिसांना प्राप्त झाल्याचे समजते त्यामुळे नेमका खरा प्रकार लवकरच उघड होणार आहे.

दरोडा की फसवणूक ? संभ्रम कायम !
खंडव्याच्या लाकूड व्यापार्‍याने लोहमार्ग पोलिसांना आपल्या भुसावळस्थित भावाला रक्कम देण्यासाठी भुसावळात आल्याचा जवाब लोहमार्ग पोलिसांना दिला आहे मात्र शहरात भाऊ राहत असताना त्यास रेल्वे स्थानकावर रक्कम देण्याचे नेमके प्रयोजन काय? हादेखील गहन प्रश्‍न आहे शिवाय व्यापारी रक्कम आणणार असल्याचे आरोपींना कळाले कसे? तसेच ही रक्कम दुप्पटीच्या आमिषाने तर व्यापार्‍याने भुसावळात आणली नाही ना? असादेखील संशय आहे त्यामुळे सुरुवातीला दोन स्वतंत्र दरोड्याचे गुन्हे बाजारपेठ पोलिसांनी दाखल केले असलेतरी लोहमार्ग पोलिसात या प्रकरणाला आणखी काही वेगळे वळण मिळते का? हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सत्य जनतेपुढे येणार -दिलीप गढरी
या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही बारकाईने चौकशी केली असून लवकरच सत्य समोर येईल, अशी सूचक प्रतिक्रिया लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिली. लोहमार्गच्या हवालदाराचे निलंबन झाले असून लवकरच आम्ही त्यास अटक करून दोषारोपपत्र दाखल करू, असेही त्यांनी सांगितले.