भुसावळ : वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील आरोपींच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फिर्यादी त्रिशुल कैलूक (पारडी, ता.कारंजा) हे भुसावळ बुकींग ऑफिसजवळील चौकशी खिडकीजवळ उभे असताना चोरट्यांनी त्यांचा 26 रोजी नऊ हजार 300 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी मो.इसराईल निहाम अहमद (36, सुप्रीम कॉलनी, जळगाव) व शेख शहजाद शेख असगर (20, गौसिया नगर, भुसावळ) यांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. दुसर्या गुन्ह्यात फिर्यादी रेखा अंगदसिंग (रामेश्वर नगर, धनपुरी, रायपूर) या 5 रोजी गांधीधाम पुरी एक्स्प्रेसच्या कोच- ए वनमधून प्रवास करीत असताना त्यांची ट्रॅव्हलबॅग चोरीला गेली. त्यात आठ हजारांची रोकड व अन्य सामान मिळून नऊ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी आसीफ असलम शेख (19, मंगरूळ, सातपूर, जि.खरगोन) यास अटक करण्यात आली. गुन्ह्यातील दोन हजार 300 रुपये हस्तगत करण्यात आले. तिसर्या गुन्ह्यात डाऊन हावडा मेलच्या एस- 4 बर्थवरून 26 डिसेंबर रोजी फिर्यादी बदरजहा मो.शफीक (55, कब्रस्थान रोड, मोमीनपुरा, भानखेडा, नागपूर) यांची पर्स लांबवण्यात आली. पर्समध्ये 40 हजारांच्या सोन्याच्या चार अंगठ्या, एक हजारांचा मोबाईल, 800 रुपयांची रोकड आदी मिळून 42 हजार 300 रुपयांचा सामान होता. या प्रकरणी सोपान प्रल्हाद भिवटे (28, खिरोडा, संग्रामपूर, जि.बुलढाणा) यास अटक करण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुनील इंगळे, मधुकर न्हावकर, नितीन पाटील, अजित तडवी, शैलेंद्र पाटील, जयकुमार कोळी, जगदीश ठाकूर आदींच्या पथकाने केली.