भुसावळ : मध्य रेल्वेतील महत्त्वपूर्ण जंक्शन स्थानक असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानक कात टाकत असून या अनुषंगानेच भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात तसेच रेल्वे परीसरात सौंदर्यी करणाचे काम वेगात सुरू आहे. मंगळवारी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तत्पूर्वी सोमवारी दिवसभर या पोलिस स ठाण्यातील फाईल व इतर सामान नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. डीआरएम आर.के.यादव यांनी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर रेल्वेच्या उत्तर व दक्षिण दोन्ही प्रवेशद्वारांचे सौंदर्यीकरण, अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. याचाच भाग म्हणून दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत पाडण्यात आली. सुरुवातीला चार खोल्या पाडल्यानंतर या ठिकाणी खडकी (पुणे) येथून आणण्यात आलेले टी-५५ बॅटल टँक अर्थात रणगाडा ठेवण्यात आला. उरलेल्या इमारतीच्या खोल्या पाडून येथे अद्ययावत उद्यान उभारण्यात येणार आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमध्ये एकूण १५ खोल्या होत्या. यातील क्राईम कार्यालय, गुप्त माहिती विभाग, एलसीबी व डीबी या खोल्या आधीच पाडण्यात आल्या. उरलेल्या खोल्यातील महिला व पुरुष लॉक अप, प्रभारी अधिकारी कार्यालय, सहायक प्रभारी अधिकारी कार्यालय, वायरलेस रूम, मुद्देमाल रूमच्या तीन खोल्या, ठाणे अंमलदार कार्यालय, ड्युटी अंमलदार कार्यालय, संगणक कक्ष, कारकून खोली मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. दरम्यान दोन जेसीबी यंत्राच्या साह्याने लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या प्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांनी कामाचा आढावादेखील घेतला.
बँटल टँक टी-५५ ला पाच रंग
खडकी (पुणे) येथून तीन दिवसांच्या प्रवासानंतर आणण्यात आलेला बॅटल टी-५५ या क्रीम, मिल्ट्री ग्रीन, सिम्पल ग्रीन, रेड सिग्नल व काळा असे एकूण पाच रंग मारण्याचे काम सुरू आहे. त्याचेही अधिकारी वर्गाने निरीक्षण केले. रंगरंगोटीनंतर या रणगाड्याची सेल्फी पॉईट म्हणून ओळख निर्माण होणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.