प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांचे आदेश ; भुसावळ विभागातील पोलिस अधिकार्यांची आढावा बैठक
भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना राबवल्या जात असून निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात श्रीकुमार चिंचकर यांनी भुसावळ विभागातील पोलिस अधिकार्यांची बैठक घेवून निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना केल्या. विभागातील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना चिंचकर यांनी प्रसंगी केल्या.
आढावा बैठकीत अधिकार्यांना सूचना
प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी भुसावळ विभागातील पोलिस अधिकार्यांची बैठक झाली. प्रसंगी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, बोदवड, मुक्ताईनगर तसेच वरणगाव येथील पोलिस अधिकार्यांची उपस्थिती होती. प्रांत चिंचकर यांनी विभागातील गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सूचना केल्या तसेच आदर्श आचारसंहितेची आपापल्या स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या.
यावलमध्ये निवडणूक कर्मचार्यांना प्रशिक्षण
यावल- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाच दिवस सतत चार सत्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरू आहे. रावेर व चोपडा विधानसभा मतदार संघात येणार्या तालुक्यातील सर्व 204 मतदान केंद्रावरील सुमारे एक हजार 800 कर्मचार्यांना पाच दिवसात दुसर्या टप्प्यातील ईव्हीएम सह व्हिव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण दिले जात आहे. मंगळवारपासून सुरू झालेले प्रशिक्षण हे शनिवारपर्यंत चालणार आहे.
भुसावळात बीएलओंना प्रशिक्षण
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व तालुक्यातील 350 बीएलओंना प्रभात कॉलनीतील कार्यालयात बुधवारी सकाळी नऊ ते एक व दोन सहा दरम्यान दोन टप्प्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अधिकार्यांनी प्रत्यक्षात यंत्राची हाताळणीही केली.