मुक्ताईनगर नगरपंचायत वगळता विभागातील सर्व पालिका कर्मचारी सहभागी ; सर्वसामान्य नागरीकांचे हाल
भुसावळ- नगरपालिकेच्या कर्मचार्यांना आकृती बंधात समाविष्ट करावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजदारी कर्मचार्यांना विनाअट नगरपंचायतीत समोशन करावे, सेवानिवृती वेतनाचा लाभ मिळावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील पालिका कर्मचार्यांनी बेमुदमत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. भुसावळ विभागातीलमुक्ताईनगर नगरपंचायत वगळता इतर सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
भुसावळात कर्मचार्यांची निदर्शने
भुसावळ- 23 मागण्यांसाठी राज्यव्यापी पालिका कर्मचारी संपावर उतरले असून भुसावळ पालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभागांतील 635 पैकी 450 कर्मचार्यांनी मंगळवारच्या संपात सहभाग घेतला. पालिकेतील सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, अस्थापना, करवसूली, रेकॉर्ड आदी सर्व विभागांचे कामकाज मंगळवारी ठप्प होते. पालिका कर्मचार्यांनी आवारात निदर्शने करुन काम बंद ठेवल्याने सर्वसामान्य नागरीकांना मिळणार्या जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी, करभरणा, तक्रार निवारण आदी सर्व सुविधा ठप्प झाल्या. तक्रारींसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मंगळवारी राज्य शासनाने संपाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास बुधवारपासून भुसावळ पालिकेच्या अखत्यारीत येणार्या पालिका रुग्णालय, अग्निशमन व आरोग्याच्या आपत्कालीन सेवा देखील बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना संपाचा फटका बसण्याची भीती आहे.
यांनी केली निदर्शने
मंगळवारी सकाळी भुसावळ पालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे, सरचिटणीस दिनेश अहिरे, उपाध्यक्ष सुभाष ठाकूर, लेखापाल संजय बाणाईत, आर.डी.पाटील, भास्कर पाटील, संजय जावळे, जगदीश फालक, नगीन सोनार, प्रकाश घेंगट, प्रदीप पवार यांच्यासह शेकडो कर्मचार्यांनी निदर्शने केली.
वरणगावातही कामबंद आंदोलन
वरणगाव- महाराष्ट्र राज्य शासनाने नगरपरिषद कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे वरणगाव नगरपालिकेच्या 125 कर्मचार्यांनी 1 जानेवारीपासून कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला. वरणगाव येथे आंदोलनात कर्मचारी मुक्तार अहमद खान, मेघराज चौधरी, राजेंद्र धनगर, रमेश कोळी, निलेश झांबरे, सुरेश शेळके, जतीन सपकाळे, रवी इंगळे, महेंद्र मोरे, सुभाष जोहरे, कमलाकर सुरवाडे, प्रमोद भोळे, गणेश कोळी, संजय माळी, सुधाकर मराठे, रवींद्र सोनार, अनिल तायडे, सुरेखा मराठे, मालिनी सोनवणे, योगेश धनगर, राजेंद्र भोई, बाबुलाल भोई, वासुदेव भोई, प्रल्हाद कोळी, गंभीर कोळी, अशोक इंगळे, गोकुळ भोई, विजय मराठे, कृष्णा माळी, राजू गायकवाड, अनिल चौधरी, प्रमोद बावणे आदी कर्मचारी सहभागी झाले.
रावेर नगरपालिकेतही कामबंद
रावेर- रावेर नगरपालिकेच्या सफाई कामगार, पाणीपुरवठा कर्मचारी, व कार्यालयीन कर्मचार्यांनीदेखील 1 जानेवारीपासून 23 मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. पालिकेत 87 कर्मचारी सहभागी झाल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र छपरीबंद यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याधिकारी यांनी मुकादमांसोबत सफाई कर्मचार्यांच्या हजेरीसाठी घेतलेल्या बैठकीत रवींद्र छपरीबंद यांनी अपशब्द वापरून धमकावल्याने त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. दोन दिवसात म्हणणे न मांडल्यास शासकीय कर्मचार्यास शिवीगाळ व धमकावल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे दिलेल्या नोटीसीत मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी म्हटले आहे.