भुसावळ विभागात मुसळधार पाऊस ; नदी-नाल्यांना आला पूर

0

साळशिंगीची तरुणी पुरात बेपत्ता ; विभागात ट्रॅक्टर पाण्यात बुडाले, जनावरेही वाहिली

भुसावळ- भुसावळ विभागातील यावलसह बोदवड, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने शेती पिकांचे नुकसान झाले तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या दमदार पावसाने समाधानही व्यक्त होत आहे. दरम्यान पावसामुळे बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील विद्या सोपान चौधरी (16) ही तरुणी साळशिंगी तलावाला आलेल्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झाली असून रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता तर गावातील तीन बैले या पाण्यात बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. पालजवळ गाय वाहिल्याचे वृत्त असून ट्रॅक्टर ट्रॉली बेपत्ता झाली तर यावल तालुक्यातील वड्री येथील खडकाई नदीच्या बंधार्‍यात दोन ट्रॅक्टर बुडाले तर सुदैवाने वेळीच मजुरांनी सतर्कता दाखवल्याने ते बचावले. रावेर तालुक्यात या पावसामुळे केळी बागांना मोठ्या प्रमाणावर पुन्हा फटका बसला.

रावेर ; सुकी नदी दुथडी वाहिली
रावेर- तालुक्यातील पाल अभयारण्यात गुरुवारी दुपारी 1.30 ते तीन वाजेदरम्यान सुकी नदीच्या उगमस्थानी मध्यप्रदेशात जोरदार वादळी पाऊस झाल्याने पालच्या जंगलातून जाणारी सुकी नदी दुथडी वाहू लागल्याने केळी पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सुकी धरणातील जलसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. असाच पाऊस राहिला तर या वर्षी लवकरच सुकी धरण भरून ओसंडून वाहिल, अशी अपेक्षा आहे.

गाय वाहिली तर ट्रॅक्टर ट्रॉली बेपत्ता
मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतातील पाल या जंगलात दुपारी जोरदार पाऊस झाल्याने सुकी नदी दुथडी वाहुन पुर आला. मध्यप्रदेशातुन सुकी नदीला आलेल्या पुरात एक गाय वाहून गेली तसेच नदी लगतच्या गारखेडा येथील ट्रॅक्टरची ट्राली नदीपात्रात लागलेली होती . अचानक आलेल्या पुराने ट्रॉली वाहून गेली आहे. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने पुरात वाहुन गेलेली ट्रॉली सापडलेली नाही.

मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यातही नदी-नाल्यांना पूर
सातपुडा पर्वतात झालेल्या पावसाने मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा व चिंचखेडा येथील नदीला पूर आला तर बोदवड तालुक्यातही झालेल्या पावसामुळे साळशिंगी गावाजवळील नदी-नाल्यांना पूर आला होता. बोदवड तालुक्यात पेरलेले बी-बियाणे वाहून गेल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले. काही घरांच्या टाक्या तसेच पत्रेदेखील उडाल्याचे सांगण्यात आले.

यावल तालुक्यात दोन ट्रॅक्टर पाण्यात बुडाले
यावल- शहर व तालुक्यातही समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे तर तालुक्यातील वड्री धरणाजवळ अचानक आलेल्या पुरामुळे दोन ट्रॅक्टर पाण्यात बुडाल्याची घटना गुुरुवारी दुपारी घडली. काम करणार्‍या मजुरांसह चालकाने प्रसंगावधान राखल्याने ते बचावले मात्र दोन्ही वाहने पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भुसावळ शहर व परीसरातही दुपारी पावसाच्या सरी बरसल्या.