भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांनी महामानवास अभिवादन

0

शाळा-महाविद्यालयासह संस्था, संघटनांमध्ये कार्यक्रम ; मान्यवरांनी सांगितला महामानवाच्या कार्याचा महिमा

भुसावळ- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ विभागात अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध भागातून पालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महामानवाच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल रॅली काढण्यात आली. विविध संस्था, संघटनांतर्फे तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमातून महामानवास अभिवादन करण्यात आले.

डीआरएम कार्यालयास महामानवास अभिवादन
भुसावळ- मध्य रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात महामानवास अभिवादन करण्यात आले. डीआरएम आर.के.यादव यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक सहाय्यक कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी यांनी केले. अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी आदींची उपस्थिती होती.

शिवसेनेतर्फे महामानवास अभिवादन
भुसावळ- महापरीनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष निलेश के.महाजन, दक्षिण विभागाचे शहराध्यक्ष बबलू बर्‍हाटे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी शहर संघटक योगेश बागुल, गुणवंत पाटील, स्वप्नील साळवे, दिनेश परदेशी, बबलू नेटकर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय दलित पँथर
भुसावळ- राष्ट्रीय दलित पँथरतर्फे महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय साळवे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा संघटक गणेश जाधव, भुसावळ शहराध्यक्ष राजू तायडे, रामअवतार परदेशी, चेतन पारधे, कृष्णा खरारे, प्रवेश पिंजारी, सचिन वाघ, तोहसीप बागवान, आकाश सपकाळे, अजय शेख, आदींची उपस्थिती असल्याचे विजय साळवे, प्रेमचंद सुरवाडे, राजू तायडे कळवतात.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल
भुसावळ- बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शाळेचे मुख्य प्रशासक प्रवीण इंगळे, मुख्याध्यापिका अनिता तपासे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल राष्ट्रवादीतर्फे अभिवादन
यावल- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयात महामानवास अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुखदेव बोडले यांनी त्रिशरण, पंचशील म्हटले. उपनगराध्यक्ष मुकेश येवले, विजय पाटील, एम.बी.तडवी यांनी प्रतिमेचे पूजन केले. युवक अध्यक्ष देवकांत पाटील, नरेंद्र पाटील, वसंत पाटील, भागवत अटवाल, बापू जासूद, अब्दुल गनी खान, किशोर माळी आदींची उपस्थिती होती.

महामानवाचे कार्य अलौकीक -प्रा.राजेंद्र राजपूत
फैजपूर- प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वात भारताचे अतिउच्च आणि श्रेष्ठ प्रतिनिधित्व करणारे थोर कायदेपंडित आणि मानवशास्त्रज्ञ होते. त्यांच्या 65 वर्षाच्या संघर्षात्मक कारकिर्दीत परदेशात पी.एच.डी., डॉक्टर ऑफ सायन्स सारख्या प्रतिष्ठित पदव्यांसोबतच संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या त्रीसूत्रीवर आधारीत राज्यघटना निर्माण केली. बाबासाहेबांनी दुर्लक्षित आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली, असे मत प्रा.राजेंद्र राजपूत यांनी तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित महापरिनिर्वाण दिवसाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी होते. प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समितीचे चेअरमन प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन समिती सदस्य प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर यांनी मानले. यशस्वीतेसाठी तापी परीसर मंडळ व्यवस्थापन, महाविद्यालयाचे प्रशासन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री नितीन सपकाळे, सिद्धार्थ तायडे, चेतन इंगळे, शेखर महाजन, पराग राणे आदींनी परीश्रम घेतले.

द वर्ल्ड स्कूलमध्ये अभिवादन
भुसावळ- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोलते फौंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. महामानवाच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. प्राचार्य नितीन कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्र संचालन दीपिका पाटील यांनी केले.