जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून चौघे जागीच ठार
दोन शेतकर्यांसह महिला व प्रौढाचा समावेश : पावसाने पिकांना पुन्हा फटका
भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळ शहर व विभागात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतांमध्ये दोन शेतकर्यांसह एका महिला शेतमजुराचा व न्हावीच्या प्रौढाचा समावेश आहे. या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा व यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शेतकर्याचा मृत्यू झाला तर बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्रगणेत झाडाच्या आश्रयाला थांबलेल्या महिला मजुराचा मृत्यू झाला तर चौथ्या घटनेत यावल तालुक्यातील न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.
हरताळा शिवारातील शेतात वीज पडून शेतकर्याचा मृत्यू
मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा शिवारात वीज कोसळल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. शुक्रवार. 1 रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. या घटनेत अजय रुस्तम घोडकी (38, रा.निमखेडी खुर्द) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. निमखेडी खुर्द येथील शेतकरी अजय रुस्तम घोडकी हे शुक्रवारी दुपारी हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना विजांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात होताच वीज कोसळल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे.
चिंचखेड प्रगणेत वीज पडून महिलेचा मृत्यू
बोदवड : तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथे विजांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर झाडाच्या आश्रयाखाली थांबलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने 19 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन महिला जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. पर्वता गोपाळ भील (19) असे मयत महिलेचे नाव आहे तर सोबतच्या सुनंदा गजानन भील व वैजंता सुभाष भील या दोन महिला जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. शुक्रवारी दुपारी शेतकरी नवलसिंग सुरतसिंग पाटील यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी सुमारे 20 वर महिला कामासाठी आल्या होत्या. याचवेळी विजांच्या गडगडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाल्यानंतर महिला झाडाखाली आश्रयाला आल्यानंतर वीज कोसळल्याने पर्वता भील या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन महिला जखमी झाल्या. तदरम्यान, तालुक्यातील मनूर बुद्रुक येथे मुरलीधर शेळके यांचा बैल वीज कोसळल्याने ठार झाला तसेच जोरदार वादळामुळे बोदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.
डोंगरकठोर्यात शेतकर्याचा मृत्यू
यावल : गुरे चराईसाठी शेतात गेलेल्या 50 वर्षीय पशूपालक शेतकर्याचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर (50) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
डोंगरकठोरा, ता.यावल येथील धनगर वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर हे शुक्रवारी गुरे चराईसाठी सातपुड्याच्या पायथ्याशी अभोटा शिवारात गेले असता पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील राजरत्न आढळे, सरपंच नवाज तडवी, तलाठी वसीम तडवी, दिलीप तायडे आदीनी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परीवार आहे.
न्हावी शिवारात गुरे चराईसाठी गेलेल्या प्रौढाचा वीज कोसळल्याने मृत्यू
फैजपूर : तालुक्यातील न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. हमीद रूबाब तडवी (47, रा.न्हावी, ता.यावल) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ शुक्रवारी गुरे चराईसाठी गेल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहान लागल्याने पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस हबीब तडवी यांच्या खबरीनुसार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राजेश बर्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परीवार आहे.