जिल्हा परीषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रम ; रॅलीचेही आयोजन
भुसावळ- शिक्षक दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहर व विभागातील जिल्हा परीषद मराठी माध्यमांच्या शाळांसह खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकाची भूमिका वठवत शाळा चालवली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅलीही काढली.
ऋणातून उतराई अशक्य- रवींद्र पाटील
साकेगाव- शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळेच आज प्रत्येक व्यक्ती आपापल्या जीवनात प्रगती करू शकला आहे. अशा या शिक्षकांचे ऋण आपण कदापि फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी येथे केले. साकेगाव येथील जिल्हा परीषद शाळा व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षकदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे, सौ. अश्विनी पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, शाळेत जाऊन शिक्षकांचा सत्कार करण्याची ही अभिनव संकल्पना कौतुकास्पद आहे. प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविणारा व शिक्षकांचे मनापासून कौतुक करणारा पदाधिकारी असल्यास शिक्षकांसाठी ही सकारात्मक बाब असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे यांनी शिक्षकांविषयीची आदरभावना प्रत्येकाने ठेवल्यास समाजात संस्कारांची रुजवण होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. आभार जितेंद्र झांबरे यांनी मानले.
नगरपालिका शाळा क्रमांक एक
भुसावळ- द.शि.विद्यालयाच्या आवारातील नगरपालिका शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका साधना महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापिका साधना महाजन, उपशिक्षक खिलचंद पाटील व उपशिक्षिका मनीषा तायडे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शाळेतर्फे डॉ.जगदीश पाटील यांचा सत्कार मुख्याध्यापिका साधना महाजन यांनी केला. सूत्रसंचालन खिलचंद पाटील यांनी तर आभार मनीषा तायडे यांनी मानले.
पोदार इंटरनेशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन
भुसावळ- पोदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा केला. प्राचार्य विनयकुमार उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक हा समाज परीवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते, असे ते म्हणाले. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गौरवार्थ नृत्य नाटिका सादर केली. सूत्रसंचालन इयत्ता दहावी व अकरावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी लविना मनवानी, ज्ञानेश्वरी नेमाडे, अरीथ दास यांनी केले.पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा शृंगी, शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सीमा पाटील, नीलम अग्रवाल, एस्तर विंन्सेंट, रेखा मुळे, वंदना नाईक, प्रकाश दलाल तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
सु.रा.कदम प्राथमिक विद्या मंदिर
वरणगाव- श्रीनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित सुशिला राम कदम प्राथमिक विद्या मंदिरात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा पोशाक घालून एक दिवसाकरीता शिक्षक बनून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. यामध्ये वसुंधरा माळी, वैष्णवी पाटील, कल्याणी बोदडे, समृध्दी माळी, जान्हवी चौधरी, सर्वेश धनगर, जयश्री कोलते, ज्ञानेश माळी हे विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकासंगीता चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
ताप्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली
भुसावळ- ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे प्राचार्य निना कटलर यांनी पूजन केले. याप्रसंगी रूकसाना खान, मनप्रित कौर, रीतू प्रभुदेसाई, कय्युम शेख, प्रतिभा काकडे,श्नद्धाली घुले, अनिता येवले, माधुरी सुपे,पॅट्रेशिया हॅसेट आदींची उपस्थिती होती. प्रसंगी विद्यार्थ्यांनी रॅली काढली.
मनवेल जि.प.शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक
यावल- तालुक्यातील मनवेल येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षक दिन विविध कार्यक्रमामनी साजरा करण्यात आला. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत प्रथम डॉ.सर्वपली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेतील मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. उपशिक्षक सुनील काळे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 11 ते तीन या वेळात विद्यार्थ्यांनी शाळा चालवली तर मुलींनी शाळेत प्रथमच साडी डे ही साजरा केला. उपशिक्षक प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले.