भुसावळ पालिकेत पाच पदांवर महिलांना मिळाली संधी : ठिकठिकाणी स्थायी समिती सभापतींसह सदस्यांची झाली निवड
भुसावळ : भुसावळ विभागातील पालिकांमध्ये गुरुवारी विषय समिती सभापती निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांचा मान्यवरांनी सत्कार केला तर आता जनतेला समित्यांच्या माध्यमातून विविध विषय मार्गी लागण्यासह विकासकामांची अपेक्षा आहे. भुसावळ पालिकेत पाच महिलांना सभापतींना सभापतीपदाची संधी मिळाली महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पडलेले महत्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
भुसावळ पालिकेत महिलाराज
भुसावळ- भुसावळ पालिकेत विषय समिती सभापती निवडीच्या सभेत सहा सभापतींची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक धीवरे होते. व्यासपीठावर मुख्याधिकारी करुणा डहाळे व नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला.
पाच समित्यांवर महिलांना संधी
विषय निहाय सभापती असे- सार्वजनिक बांधकाम- प्रीतमा गिरीश महाजन, शिक्षण- मुकेश नरेंद्र पाटील, स्वच्छता-वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती- सोनल रमाकांत महाजन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण- शोभा अरुण नेमाडे, महिला व बालकल्याण- पूजा राजू सूर्यवंशी
स्थायी समितीत यांचा समावेश
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष रमण भोळे, उपसभापती तसेच नियोजन विकास समिती सभापतीपदी शेख सईदा शफी तर सदस्य म्हणून प्रीतमा महाजन, मुकेश पाटील, सोनल महाजन, शोभा नेमाडे, पूजा सूर्यवंशी, प्रतिभा पाटील, रमेश नागराणी व मीनाक्षी धांडे यांची निवड करण्यात आली.
जनआधारच्या नगरसेवकांनी फिरवली पाठ
विषय समिती सभापती निवडीच्या सभेला पालिकेतील विरोधी गटातील जनआधार पार्टीच्या सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरवली तर सत्ताधारी गटातील काही नगरसेवकही अनुपस्थित राहिले. प्रभाग 24 मधील निवडणुकीमुळे सभेला उपस्थित राहू शकलो नसल्याचे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे म्हणाले. सभापती निवडीसाठी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला.