भुसावळ पालिकेत स्थायी समितीवर साधना भालेरावांची वर्णी ; यावल पालिकेत काँग्रेस प्रबळ असताना उमेदवार न दिल्याने नाचक्की
भुसावळ- भुसावळ विभागातील पालिकांमध्ये सोमवारी सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली तर सर्वच ठिकाणी सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. भुसावळ पालिकेत स्थायी समितीवर साधना भालेरावांची वर्णी लागली तर यावल पालिकेच्या विषय समिती सभापतीची निवड बिनविरोध होऊन काँग्रेसने मात्र या निवडणुकीमध्ये उमेदवार न दिल्यामुळे मोठा पक्ष असूनही सभापतीपदासाठी नामांकन दाखल न केल्याने त्यांची नाचक्की झाली. दरम्यान, सभापती निवडीनंतर पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यकर्त्यांनी प्रसंगी निवडीनंतर जल्लोष केला.
भुसावळात सभापतींची बिनविरोध निवड
भुसावळ- निवडीसाठी पालिका सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छूकांना नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली. नियोजीत वेळेनंतर दुपारी 12 वाजता सभेला सुरवात झाली. सुरवातीला छाननीनंतर माघारीसाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला. बांधकाम समितीपदी रवींद्र बाबूराव खरात, शिक्षण सभापती सभापतीपदी मंगला संजय आवटे, आरोग्य समिती सभापतीपदी सुषमा किशोर पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापतीपदी महेंद्रसिंग ठाकूर तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सविता मकासरे यांची एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावरील व्यक्ती नियोजन व विकास समितीच्या समितीवर पदसिध्द सभापती असल्याने उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांची वर्णी लागली. सभेनंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचे स्वागत केले.
यावल पालिकेतही सभापतींची बिनविरोध निवड
यावल- तहसीलदार कुंदन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली मात्र प्रत्येक पदासाठी एकमेव अर्ज असल्याने सभापतींची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.पाणीपुरवठा सभापतीपदी रुखमाबाई भालेराव, शिक्षण सभापतीपदी पौर्णिमा फालक, महिला व महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी कल्पना दिलीप वाणी तसेच आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश पोपटराव येवले यांची निवड करण्यात आली. गतवर्षी संख्याबळ कमी असतानादेखील शहर विकास आघाडी व श्री महर्षी व्यास आघाडीने सभापतीपद आपल्याकडे ठेवले होते र यंदाही अतुल पाटील व राकेश कोलते ही परंपरा कायम राखली. व्यासपीठावर नगराध्यक्ष सुरेखा कोळी, सिनियर क्लर्क राजेंद्र देवरे हे उपस्थित होते. निवडणूकप्रसंगी अभिमन्यू विश्वनाथ चौधरी, शेख असलम शेख नवी हे अनुपस्थित राहिले.
रावेरला विषय समिती सभापती निवड बिनविरोध
रावेर- नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी विजयकुमार ढगे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्षा रंजना गजरे व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. जनक्रांती आघाडीचे गटनेते आसीफ मोहंमद दारा मोहंमद यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी, स्वच्छता व आरोग्य दवाखाना समिती सभापतीपदी हमीदा बी आयुब खान पठाण, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी पार्वताबाई शिंदे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावर रंजना योगेश गजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी संगीता सुर्यकांत अग्रवाल, संगीता शिरीष वाणी, ललिता मल्हारी बर्वे, सुरज प्रकाश चौधरी, शे.नुसरत यास्मिन कलीम, आसीफ मो.दारा मोहंमद, सुधीर गोपाळ पाटील, खा असदुल्लाखॉ महेबुबखॉ, शारदा देविदास चौधरी, सादीक अब्दुल नबी, हमीदाबी अयुबखॉ पठाण, प्रकाश अग्रवाल, राजेंद्र रामदास महाजन, प्रल्हाद रामदास महाजन, जगदीश नथ्थू घेटे, पार्वताबाई गणपत शिंदे, संगीता भास्कर महाजन तसेच सदस्य सभेस उपस्थित होते.