ग्राहक तक्रारींचा नंबर सतत व्यस्त ; अधिकारी फोन स्वीकारत नसल्याने संताप
भुसावळ- शहरातील वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य व अनागोंदी कारभारामुळे नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री साखर झोपेत असताना काही कारण नसतानाही शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून वीज दुरुस्तीचे कामाचे नियोजन न करता वेळी अवेळी दुरुस्तीची कामे करून वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. वीज गेल्यानंतर ग्राहक तक्रारीसाठी असलेला क्रमांक सतत व्यस्त ठेवला जात असल्याने व त्यातच वरीष्ठ अधिकारीदेखील दूरध्वनी स्वीकारत नसल्याने ग्राहकांच्या संयमांचा बांध सुटून अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात वीज कंपनीच्या मुख्य अभियंत्यांसह उर्जा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
अधिकार्यांवर राहिला नाही कुणाचा वचक
वीज बिल भरले न गेल्यास तत्काळ वीज तोडली जाते मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न आहे. बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास यावल रोड भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेकांनी वीज कंपनीच्या कार्यालयातील भ्रमणध्वनीवर संपर्क साधला मात्र कर्मचार्यांनी सातत्याने हा भ्रमणध्वनी व्यस्त ठेवून नागरीकांच्या संतापात अधिक भर घालण्याचे काम केले शिवाय वीज कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांना सातत्याने दूरध्वनी करूनही त्यांनीही प्रतिसाद न दिल्याने सुन वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात जळगाव रोड विभागातील रहिवासी प्रा.धीरज पाटील यांनी जळगाव विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली असून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दिवसा तसेच ऐन मध्यरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकार्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.
कर्मचार्यांच्या निष्क्रियेतचा ग्राहकांना फटका
बुधवारी रात्री 10 वाजतानंतर मेन सर्व्हिस लाईनची तार अचानक तुटली. यामुळे शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्याने माहिती दिली मात्र नंतर त्या अभियंत्याला मोबाईल उचलण्यास सवड नव्हती. रात्री अनेक वेळा नागरिकांनी फोन केले पण सुविधा केंद्र व अधिकारी यांनी फोन उचलला नाही. वीज वितरणचे बहुतांश महत्वाचे अधिकारी बाहेर गावी राहातात. वीज केंद्रातील रात्रपाळीचे कर्मचारी जाणीवपूर्वक मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात. वीज वितरणच्या कर्मचार्यांनी आता ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांच्या वतीने देण्यात आला आहे.