नूतन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची ग्वाही ; पदभार स्वीकारला
भुसावळ- पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी सोमवार, 18 रोजी भुसावळ पालिकेत येऊन पदभार स्वीकारला. याप्रसंगी पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. भुसावळ शहराच्या विकासाला आपले प्रथम प्राधान्य राहणार असून नागरीकांना भेडसावणार्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपले निश्चित प्रयत्न राहतील, अशी ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली. पहिल्याच दिवशी त्यांनी पालिकेत सर्व विभागाच्या खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. दुपारनंतर ते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेणार आहेत.
पदाधिकार्यांनी केले स्वागत
उपनगराध्यक्षा लक्ष्मी रमेश मकासरे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू ठाकूर, अमोल इंगळे, राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, वसंत पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.
पूर्णवेळ मुख्याधिकार्यांमुळे शहर विकासाला चालना
मुख्याधिकार्यांच्या बदल्याचे नगरविकास विभागाचे सहसचिव सं.श.गोखले यांनी 12 रोजी काढले होते तर भुसावळ पालिकेचे मुख्याधिकाकारी बी.टी.बाविस्कर सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त असल्याने तात्पुरता पदभार चाळीसगावचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी मुख्याधिकार्यांनी पदभार स्वीकारल्याने शहर विकासाला आता खर्या अर्थाने चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुख्याधिकार्यांपुढे अनेक आव्हाने !
भुसावळ शहरातील वाढते अतिक्रमण, पाणीटंचाई, जलवाहिनीला लागलेली गळती, अल्प कर्मचारी संख्या, संथ गतीने सुरू असलेली नालेसफाई, अमृत योजनेला गती, शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न यासह अनेक प्रश्न शहरवासीयांना भेडसावत असल्याने हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मुख्याधिकार्यांची कसोटी लागणार आहे.