भुसावळ शहरातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामे व्हावीत
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मागणी : रींग रोडच्या कामामुळे समाधान
भुसावळ : शहरातील सुरभी नगर, साधना नगर, देना नगर, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, नेब कॉलनी, रघुकुल कॉलनी, सुहास नगर, गोविंद कॉलनी, गणपती मार्बल, यशोधन पार्क या परीसरातील कॉलनी अंतर्गत डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने शहरातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.
अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था
नेमाडे यांच्या तक्रारीनुसार, अमृत योजनेची पाईप-लाईन अंथरण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची वाताहत झाली. अमृत योजनेच्या पाईप लाईनच्या खड्ड्यांमुळे मागील काळात मुरूम टाकला असता तो तंत्रशुद्ध फैलाव न करता ओबडधोबड पद्धतीने टाकण्यात आल्याने नागरीकांना पायी चालले सुद्धा जिकरीचे झाले आहे. सर्वच भागातील नागरीक, ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थी या प्रकाराने खूप त्रस्त झालेले आहेत. खराब रस्त्यांमुळे रस्त्यावरील धुळीने श्वसनाचे त्रास, नादुरुस्त रस्त्याने नागरीकांना वावरतांना कमरेचा त्रास, पाठ दुखी, हाडांचे त्रास निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकींचा मेंटेनन्स वाढला आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण झालेल्या भागातील रस्त्यांसह इतरही सर्व समस्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे परंतु मागणी करीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गत काळात मातृभूमि चौक ते नॅशनल हायवे पर्यंतचा रखडलेल्या रींग रोडच्या डांबरी रोडच्या कामास सुरुवात झाल्याने नेमाडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.