भुसावळ- शहरातील प्रमुख मार्गासह नागरीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना अनेक अडचणींवर मात करून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे वाहनधारक व नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नागरीक व वाहनधारकांची नाराजी दूर करण्यासाठी खड्डेमय मार्गाला मुरूमाचे ठिगळ लावण्यास सुरूवात केली आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण
शहरातील बसस्थानक मार्ग, जामनेर रोड, जळगाव रोड, यावलरोड, जवाहर डेअरी मार्ग, बाजारपेठ अशा प्रमुख मार्गासह शहरातील विविध रहिवासी भागातील मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यामुळे मार्गक्रमण करणार्या वाहनधारक व नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे वाहनधारकांची ही नाराजी दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने काही भागातील खड्डेमय मार्गांना मुरूमाच्या मातीचे ठिगळ लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
पावसामुळे निर्माण होईल चिखल
खड्डेमय मार्गावर टाकल्या जाणारा माती मिश्रीत मुरूमामूळे पावसाच्या पाण्याने चिखल निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परीणामी वाहने घसरून अपघाताचा धोका नाकारता येत नाही. यासाठी पालिका प्रशासनाने खड्डेमय मार्गाची डांबरीकरणाने दुरूस्ती करणे अत्यावश्यक आहे.तसेच गणपती बाप्पांचे अवघ्या काही दिवसावर आगमन होणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने मिरवणुकीच्या मार्गाचेही दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
काही मार्ग झाले खडतर
शहराच्या काही प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून पदरमोड करून खड्डेमय रस्त्यांवर मुरूम ऐवजी जाड दगडी मुरूम टाकला जात आहे मात्र टाकण्यात आलेल्या दगडीमुरूमाची रोलरने दबाई केली नसल्याने वाहनधारक आणि पादचार्यांना या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे. दगडमय रस्त्यावरून वाहनधारकांना अक्षरक्ष वाहन ढकलून न्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.