Gaurav Bade gang from Bhusawal banished from the district for two years भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरणार्या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाने प्रस्ताव तयार करून ते जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवले होते. या प्रस्तांवावर कारवाईला सुरूवात झाली असून शहरातील गौरव बढेसह टोळीतील अन्य तीन सदस्यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तत्कालीन अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले होते.
चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
शहरातील गौरव सुनील बढे, जितू शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव, भावेश कांतीलाल दंडगव्हाळ या चारही जणांना दोन वर्षांसाठी ततत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हद्दपार केले असून त्याबाबतचे आदेश 28 सप्टेंबर रोजी काढले आहेत. दरम्यान, पालिका निवडणुकीपूर्वी अजूनही काही उपद्रवींना हद्दपार करण्यात येणार असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
गुन्हेगारी टोळीविरोधात असे आहेत गुन्हे
गुन्हेगारी टोळीतील गौरव सुनील बढे विरोधात दंगा, खूनाचा प्रयत्न करणे, हाणामारी, शस्त्र बाळगणे, गोळीबार करणे आदी गुन्हे शहर पोलिसात गुन्हे दाखल आहेत तर जितू भालेराव, सचिन भालेराव, भावेश दंडगव्हाळ यांच्या विरूध्द खूनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, मारहाण करणे, आर्म अॅक्टप्रमाणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे शिवाय जितू भालेराव याच्याविरूध्द 2020 मध्ये हाणामारीचा तर भावेश कांतीलाल दंडगव्हाळ यांच्या विरूध्द अत्याचार, खूनाचा प्रयत्न, पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहे.