भुसावळ । शहरातील बसस्थानकासमोरील रेल्वेच्या जागेवर गेल्या पाच ते दहा वर्षांपासून बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून अनधिकृतरित्या हॉटेल व्यवसाय चालवणार्यांवर विक्रेत्यांवर रेल्वेच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी धडक कारवाई करीत दहा शेडस् उद्ध्वस्त केल्याने खळबळ उडाली. आयओडब्ल्यू, इलेक्ट्रीक विभागाच्या कर्मचार्यांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात आले. गेल्या काही वर्षांपूर्वीदेखील हे अतिक्रमण हटवण्यात आले होते मात्र मोकळ्या जागेवर रेल्वेने तातडीने बांधकाम न केल्याने पुन्हा विक्रेत्यांनी पत्री शेड टाकून बांधकाम केले होते.
अत्यंत गोपनीय पद्धत्तीने कारवाई
बसस्थानकासमोर रेल्वेची प्रशस्त जागा आहे मात्र ती काही अनधिकृत विक्रेत्यांनी बळकावत तेथे अनधिकृत हॉटेल्स सुरू केल्या होत्या तसेच अन्य कामांसाठी या जागेचा गैरवापर केला जात होता. डीआरएम आर.के.यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत काही अधिकार्यांना जागेचा सर्वे व त्यावरील अतिक्रमणाचा आढावा घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच संबंधिताना अतिक्रमण हटवण्याच्या नोटीसा दिल्यानंतर मंगळवारी तात्पुरते उभारलेले 10 शेडसचे अतिक्रमण हटवण्यात आले.
शनिवारीही मोहिम
रेल्वेच्या जागेवर क्वार्टर्समध्ये काही जण अनधितकृरित्या राहत असून त्यांनादेखील रेल्वेने पीपी अॅक्ट अन्वये नोटीस बजावली आहे. शनिवारी हे पक्के अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जंक्शनमध्ये होणार प्रवेशद्वार
भुसावळ रेल्वे स्थानकाचा प्रशासनाकडून विस्तार केला जात आहे. त्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या जागेवर उद्यानाचा विस्तार केला जाणार असून प्रशस्त प्रवेशद्वाराची उभारणी केली जाणार आहे शिवाय पार्सल कार्यालयाचादेखील विस्तार केला जाणार आहे.
मंगळवारी राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रेल्वे यार्डचे निरीक्षक डी.एच.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अत्तर सिंग, एएसआय.पी.एम.तडवी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आठ कर्मचारी, रेल्वे इलेक्ट्रीक व आयओडब्ल्यू विभागाचे अधिकारी सहभागी झाले.