भुसावळ शहरातील विवाहितेचे 20 हजारांचे मंगळसूत्र धूम स्टाईल लांबवले
भर दिवसा महेश नगरातील घटना : धूम स्टाईल चोर्यांमुळे महिलावर्गात पसरली घबराट
Dhoomstyle mangalsutra of a married woman walking on the road in Bhusawal भुसावळ : रस्त्याने पायी चालणार्या 35 वर्षीय विवाहितेच्या गळ्यातून 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र भर दिवसा धूम स्टाईल लांबवण्यात आल्याची घटना शहरातील महेश नगराजवळील धन्वंतरी मंदिराजवळ सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शहरातील रहिवासी असलेली विवाहिता सरला मुकेश ठाकूर (35, सरस्वती नगर, नंदिनी प्लाझाजवळ, भुसावळ) या सोमवार, 5 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धन्वंतरी मंदिराजवळून पायी जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या भामट्याने काही कळण्याआत महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे व 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र धूम स्टाईल हिसकावत पळ काढला. महिलेने या प्रकारानंतर आरडा-ओरड केली मात्र चोरटा पसार झाला होता.
सीसीटीव्ही आधारे चोरट्याचा शोध
महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर बाजारपेठ पोलिसात धाव घेण्यात आली. सरला ठाकूर यांनी या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार परीसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.