भुसावळ शहरात तीन नवीन उद्यानांची निर्मिती

0

युवराज लोणारी हे खरे शिवसैनिक ; नाथाभाऊंची गुगली : उद्यानांची दुरवस्था थांबवून अतिक्रमण हटवा -आमदार संजय सावकारे

भुसावळ- आधीच्या सत्ताधार्‍यांनी कामे न केल्याने शहर बकाल झाले असून मतदारांनी कौल दिल्याने कामे करण्याची आता आमची जवाबदारी असून निवडणुकीत दिलेले आश्‍वासन निश्‍चितच पूर्ण करणार असून शहरात आगामी काळात सर्व सुविधायुक्त तीन नवीन उद्यानांची निर्मिती करण्यात येत असल्याची ग्वाही माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. शहरातील श्री नगरातील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती बाल उद्यानाचे त्यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. युवराज लोणारी हे उपक्रमशील व समाजाभिमुख नेतृत्व असून खरे शिवसैनिकही आहेत, असे खडसेंनी म्हणतात उद्यानात हास्याची लकेर उमटली.

दहा कोटी खर्चातून तीन नवीन उद्याने -नाथाभाऊ
भुसावळ शहरात आगामी काळात तीन नवीन उद्यानांची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी दहा कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. शहरातील सोमानी गार्डनजवळ दहा एकरमध्ये, गणेश कॉलनीजवळ चार एकर तर हनुमान नगरात तीन एकरात उद्यानांची निर्मिती केली जाईल, असे माजी मंत्री खडसे म्हणाले. या उद्यानात केवळ चिमुकल्यांनाच खेळण्यासाठी साहित्य नसेल तर ज्येष्ठांसाठी सुविधा, जॉगिंग ट्रॅक व अन्य सुविधाही असतील. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी विकासासाठी आलेला पैसा दुसरीकडे खर्च केल्याने शहराचा विकास झाला नाही परीणाम सत्ता परीवर्तन झाले त्यामुळे आता कामे करण्याची आमची जवाबदारी असल्याचे ते म्हणाले. युवराज लोणारी यांचा समाजाभिमुख कार्यक्रम राबवण्यात हातखंडा असून आदर्श नगरसेवक असल्याचा गौरव त्यांनी केला. लोणारी यांची राजकीय जीवनाची सुरुवात सेनेतून झाल्याने ते खरे शिवसैनिक आहेत, अशी कोटी त्यांनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये खसखस पिकली. उद्याने ही शहराचा ऑक्सीजन आहे त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे ही आपली जवाबदारीदेखील आहे. शहरवासीयांना मूलभूत सुविधा पुरवण्यासोबतच उद्यानेदेखील हवी, असे खडसे म्हणाले.

तापी नदीवर होणार चौपाटी -खडसे
शहरातील तापी नदीवर आधी उद्यान होते मात्र आता तशी परिस्थिती नाही. तापी नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यानजीक चौपाटी विकसीत करण्यात येणार असून तेथे करमणुकीचे साधनेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात आराखड तयार झाला आहे. शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळाला असून आगामी काळात मुख्य रस्त्यांवर अंडर ग्राऊंड केबल टाकण्याबाबतही चर्चा सुरू आहे मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. शहरात जोपर्यंत कामे होत नाही तो पर्यंत जनतेचा आमच्यावर विश्‍वास राहणार नाही, अशी प्रांजळ कबुलीही खडसेंनी प्रसंगी दिली.

तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मोकळ्या जागा हडपल्या -नगराध्यक्ष
शहरातील उद्यानांची रया गेली असून मोकळ्या जागा तत्कालीन सत्ताधार्‍यांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरात तीन नवीन उद्यानांची निर्मिती करण्यात येत असून खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी मदत केली आहे. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांच्या काळात शहरवासीयांनी काळोखाचा कालखंड अनुभवला आहे मात्र आता परीस्थिती बदलली आहे. आगामी सात वर्षांच्या काळासाठी एलईडी दिवे शहरात लावण्यात येत असून त्या माध्यमातून पालिकेच्या वीज खर्चात बचत होणार आहे. नगरसेवक युवराज लोणारी व आपल्यात नेहमीच वाद होतात मात्र ते स्वार्थासाठी नव्हे तर शहराच्या विकासाच्या विषयांवर होतात, अशी प्रांजळ कबुली नगराध्यक्षांनी दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, रमेश मकासरे, नगरसेवक युवराज लोणारी, रमेश नागराणी, पिंटू कोठारी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, मेघा वाणी, परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, पुरूषोत्तम नारखेडे, प्रकाश (निकी) बत्रा, देवा वाणी, शैलजा पाटील, दिनेश नेमाडे, सुनील सोनवणे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार प्रा.पंकज पाटील यांनी मानले.