भुसावळ शहरात महसूल विभागाच्या पाहणीत आढळली 502 ब्रॉस अवैध वाळू

भुसावळ : शहरात तब्बल 16 ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी छापे टाकत सुमारे 502 ब्रॉस वाळूच्या साठ्यांचे पंचनामे केले. पंचनामा करून ताबे पावती करून संबंधितांच्या ताब्यात वाळू सोपंविली आहे, सर्व जणांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाणार आहे. महसूल विभागाचे जिल्हा गौण खनीज अधिकारी दीपक चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे. इंगळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली, दुपारी 12 ते सायंकाळी सातपर्यत ही कार्यवाही सुरू होती. यामुळे अवैध वाळूचा साठा करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारीनंतर प्रशासनाला जाग
जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांने माहितीच्या अधिकारात माहिती काढत शहरात मोठया प्रमाणावर वाळूचा अवैध साठा असल्याचे महसूलच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे जिल्हा गौण खनिज अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे. इंगळे, मंडळाधिकारी सतीश इंगळे, तलाठी पवन नवगाळे विनोद बारी, दिलीप पवार, भगवान शिरसाठ, महेश सपकाळे, मिलींद तायडे, जितू चौधरी यांच्या पथकाने दुपारी 12 पासून पाहाणी मोहिम सुरू केली ती सायंकाळी सातपर्यत सुरू होती. यामुूळे शहरातील ठेकेदार, दलाल, वाळूचा काळा बाजार करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली. पोलिस सोबत असतांना मिळालेल्या माहितीवर पथकातील अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केलीे. यात काही जणांनी वाळूचे मोठ्या प्रमाणावर साठे करून ठेवले होते, तर काही ठीकाणी प्रत्यक्ष बांधकामे सुरू होती. पथकातील अधिकार्‍यांनी तब्बल 16 ठीकाणी छापे टाकले.

या भागात आढळले वाळूचे अवैध साठे, कंसात ब्रासमध्ये वाळूसाठा
मांगीलाल गुजराल (5), टिव्ही टॉवरजवळ सुरेश खुशलानी (35), गायत्री शक्तीपीठाजवळ शिवराम कोळी ( 10), प्रदीप सुधाकर वाणी (6), चिंतामण शिवराम कोळी (9), कृष्णा चैतराम ठाकूर ( 24), श्रीराम मंदीराजवळ सुरेश खुशलानी (60), सुरेश सहाणी (100), रूपेश फालक (60), भूषण एकनाथ पाटील (24), मनिष जैन (20), संजय चौधरी याच्या समोरील जागेत (6), पिंपळाचे झाडा जवळ गायत्री शक्तीपीठाजवळ (20), पप्पू रतनसिंग पाटील (75), पराग भोळे (8), कैलास महाजन (40) असा एकूण 502 ब्रॉस अवैधरित्या वाळूचा साठा मिळून आला आहे.

पंचनामे करीत ताबे पावती
महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी रितसर मिळालेल्या वाळू साठ्याचे पंचनामे केले असून पंचनाम्यानंतर संबंधित वाळूची ताबे पावती तयार करून ती वाळू संबंधित वाळू मालकाच्या स्वाधीन केली आहे.

आज बजाविणार नोटिसा
महसूल विभाागाने पंचनामे केल्यावर संबंधितांना शुूक्रवारी नोटिसा बजाविण्यात येणार आहे, संबंधित वाळू मालकांनी त्यांच्या कडे सापडलेल्या वाळूबाबत महसूल विभागाला खुलासा करायचा आहे. अशी माहिती नायब तहसीलदार एस.जे. इंगळे यांनी सांगितले. त्याच्या आलेल्या उत्तरानंतरच पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.