संशयीत आरोपी जाळ्यात ; जामनेर रोडवरील हॉटेल खान्देशमधील घटना
भुसावळ : किरकोळ कारणावरून रेल्वेत गँगमन असलेल्या तरुणावर एका तरुणाने पेपर कटरने गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम अॅण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (35, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर या प्रकरणी संशयीत आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (26, जुना सातारा, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ हादरले आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय गुळींग, उमाकांत पाटील, माणिक सपकाळे, विकास सातदिवे, नेव्हील बाटली, सुनील जोशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांच्यासह अनेकांनीदेखील धाव घेत मृतदेह हलवण्याकामी सहकार्य केले. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.