भुसावळ शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण उत्साहात
भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता : कुलगुरू डॉ.माहेश्वरी
भुसावळ : जागतिक स्तरावर आर्थिक सत्तेचे केंद्र पूर्वेकडे सरकत असतांना भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला विकसीत होण्याची असलेली संधी स्टार्ट अपच्या माध्यमातून मिळाली आहे. आज जगभरात सर्वाधिक स्टार्ट अप आपल्या देशात असून रोटरीसारखी आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशभरातील विद्यापीठे यांचा ताळमेळ साधून अधिकाधिक उद्योजक आणि वैज्ञानिक आपण घडवू शकतो, असे गौरवोद्गार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांनी येथे काढले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉलमध्ये झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना कुलगुरू बोलत होते.
नूतन पदाधिकार्यांनी स्वीकारली सूत्रे
याप्रसंगी नूतन अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर यांनी मावळते अध्यक्ष हरविंदर ठेठी यांच्याकडून तर सचिवपदाची सूत्रे आर्किटेक्ट सन्मित पोतदार यांनी मावळते सचिव आशिष अग्रवाल यांच्याकडून स्वीकारली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आमदार संजय सावकारे आणि रोटरीचे सह प्रांतपाल अरुण नंदर्षी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम मावळते अध्यक्ष हरविंदर ठेठी यांनी त्यांच्या कार्यकाळातील लेखाजोखा मांडला. डॉ.मकरंद चांदवडकर यांनी आगामी वर्षभरात होऊ घातलेले उपक्रम आणि प्रोजेक्ट यांची माहिती दिली.
रोटरीत नवीन सदस्यांचा प्रवेश
याप्रसंगी त्यांनी आपल्या संचालक सदस्यांची ओळख करून दिली. त्याबरोबरच 10 नवीन सदस्य रोटरी रेलसिटीमध्ये समाविष्ट केले. नवीन सदस्यांमध्ये भुसावळ नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, किरण महाजन, डॉ.प्रशांत जाधव, डॉ.गिरीश शास्त्री, मिलिंद धर्माधिकारी, विकास भराडे, अविनाश वारके, निरव पोलदिया, विकास अहिरराव, हरमीत सिंग माखन यांना मुख्य अतिथींच्या हस्ते रोटरी पिन देऊन क्लबमध्ये सहभागी करून घेण्यात आले. सहायक प्रांतपाल अरुण नंदर्षी यांनी रोटरीचे प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांचा संदेश प्रसारीत केला. सूत्रसंचालन माजी अध्यक्ष चेतन पाटील व संदीप जोशी यांनी तर नवनिर्वाचित सचिव सन्मीत पोतदार यांनी आभार मानले. रोटरी भुसावळचे अध्यक्ष, सचिव, ताप्ती व्हॅलीच्या सचिव, इनरव्हील क्लबच्या सदस्या, भुसावळ परीसरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.