भुसावळ शहरात हरितपट्टे निर्मितीबाबत वनमंत्री मुनगंटीवार सकारात्मक

0

भुसावळ । शहरातील तापी नदी पात्रालगत वनविभागाच्या हद्दीत येणार्‍या जागेवर पालिका प्रशासनातर्फे हरित पट्टे तयार करण्यात येऊन उद्यानांची उभारणी केली जाणार आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष रमण भोळे यांनी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी वनमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मकता दर्शविल्यामुळे शहरात हरितपट्टे निर्मितीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत आहे. नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत सर्व आमदार, राज्यभरातील नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांची बैठक गुरुवार 1 रोजी पार पडली. यामध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यभरात होणार्‍या वृक्ष लागवड अभियानासंदर्भात नियोजन करण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यास वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ देण्यात आले आहे.

नागरिकांना मनोरंजानासाठी नैसर्गिक स्थळ उपलब्ध
जिल्हा पातळीवर नियोजन करुन प्रत्येक नगरपालिकेस शहरात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात उद्दीष्ठ देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने भुसावळ शहरात 5 हजारापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. शहरात अमृत योजनेच्या निधीस मंजुरी मिळाली असून या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहेे. या योजनेतून तापी नदीपात्रावर बंधारा उभारण्यात येऊन या बंधार्यालगत वनहद्दीत येणार्या भागात हिरवळ निर्माण करुन उद्यानांची निर्मिती केली जाईल त्यामुळे शहरातील नागरिकांना देखील मनोरंजानासाठी एक नैसर्गिक स्थळ उपलब्ध होणार आहे. यासाठी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पाठपुरावा सुरु केला असून वनमंत्री मुनगंटीवार यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावर वनमंत्र्यांनी संमती दर्शवित याबाबतचे प्रस्ताव तयार करुन मंत्रालयात येण्याचे सांगितले.

पालिका इमारत स्थलांतराला सहकार्य
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी देखील पालिका इमारत जीर्ण झाल्यामुळे स्थलांतर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी नगराध्यक्ष भोळे यांच्याशी चर्चा करुन याबाबत हवे ते सहकार्य करणार तसेच कर्मचारी भरती संदर्भात संचालकांकडे आकृतीबंध पाठविण्यात आला असून याचा पाठपुरावा करण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, परिक्षित बर्‍हाटे यांची उपस्थिती होती.