विरोधी नगरसेवकांनी स्वच्छतेवर सभेत ठेवले बोट ; नगराध्यक्ष म्हणाले सांघिक प्रयत्नातून शहर टाकणार कात
भुसावळ- पालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत शहराला स्वच्छतेबाबतचे थ्री स्टार मानांकन जाहीर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला तसच शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आल्यानंतर ओडीएफ प्लस करण्याबाबतचा निर्णयही एकमताने मंजूर करण्यात आला. जनआधारचे विरोधी नगरसेवक यांनी शहरात तसेच प्रभागात स्वच्छता होत नसल्याने त्याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, असा मुद्दा मांडला तर स्वच्छतेच्या विषयावरून नगराध्यक्ष व ठाकूर यांच्यात शाब्दीक वाद झाल्याने सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
सत्ताधारी नगरसेवक विरोधी बाकावर
पालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांनी सत्ताधार्यांऐवजी विरोधी बाकावर बसणे पसंत केल्याने सभा संपेपर्यंत याबाबत विविध तर्क-वितर्क लढवण्यात आले. उभय नगरसेवकांनी मात्र कुठलेही कारण नसताना केवळ सहज म्हणून बसलो असल्याची भूमिका मांडली असलीतरी यामागे काहीतरी कारण असल्याचीही चर्चा होती.
शहरात स्वच्छतेबाबत सुधारणा करणार -मुख्याधिकारी
स्वच्छ सर्वेक्षणात 2017 मध्ये देशातील दुसर्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर भुसावळ गणले गेले मात्र त्यानंतर स्वच्छतेबाबतीत अनेक सुधारणा करण्यात आल्यानंतर शहराला फास्टेट मुव्हर्स अॅवॉर्ड मिळाला, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी सांगत आगामी 2019 मध्ये देखील अशाच पद्धत्तीचे सर्वेक्षण होणार असून मानांकन मिळणार आहे त्यामुळे पालिकेतर्फे स्वच्छतेबाबतीत अनेक सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शहर स्वच्छतेसाठी मानांकन जाहीर करणे गरजेचे असल्याने थ्री स्टार मानांकन मंजूर करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांघिक प्रयत्नातून निघतील मार्ग -नगराध्यक्ष
शहरात स्वच्छतेबाबतीत अधिकाधिक सुधारणा करण्यात येतील तसेच लवकरच पालिकेच्या स्वतःच्या घंटागाड्या येणार असल्याने स्वच्छतेविषयी कुणाचीही तक्रार राहणार नाही, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. सत्ताधारी असो की विरोधकांनी काही तक्रारी असल्यास निश्चितच कराव्यात त्या सोडवल्यादेखील जातील मात्र आताच्या आता कामे करा, असे होणार नाही, असेदेखील त्यांनी बजावले.
स्वच्छता ही सामूहिक जवाबदारी -युवराज लोणारी
स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामूहिक जवाबदारी असून देशात अस्वच्छतेबाबत आलेल्या दुसर्या क्रमांकाने सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या मात्र त्यात सत्ताधार्यांचा काहीही दोष नव्हता, असे नगरसेवक युवराज लोणारी म्हणाले. स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या, असे त्यांनी सांगितले.
सभागृहात इतरांचा प्रवेश बंद करा -प्रा.सुनील नेवे
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक उपस्थित राहतात, हा मुद्दा सभा सुरु असतानाच स्विकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी मांडला. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी या मुद्द्यावर तत्काळ दखल घेतली जाईल, असे सांगितले. मात्र नेहमीच्या सभेप्रमाणे या सभेतही शेवटपर्यंत सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ सदस्यांचे नातलग उभे होते. महिला नगरसेवकांचे पतीदेखील सभागृहाच्या दरातच गर्दी करुन उभे होते.
नगराध्यक्ष व विरोधी नगरसेवकात शाब्दीक वाद
जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी शहरात स्वच्छता नावालाच होत असून बिले मात्र नियमित काढले जात असल्याचा आरोप करीत आपल्या प्रभागात एकच स्वच्छता कर्मचारी असून विकासकामे होत नसल्याचे सांगितले. सर्वांना समान न्याय मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या प्रभागात कचर्याची समस्या बिकट असून नागरीकांना रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. कचरा नेमका कुठून उचलला जातो, स्वच्छता नेमकी कशी होते? या प्रश्नावर नगराध्यक्ष संतप्त झाले. प्रत्येक बैठकीत विरोधक तमाशा करतात, बोलण्याचे काहीही तारतम्य बाळगले जात नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावत कचरा कुठून उचलला जातो ? हा प्रश्न चुकीचा असल्याचे त्यांनी सांगत ठाकूर यांच्याच प्रभागातून अमृत योजनेची पाईप लाईन टाकण्यात आली व अन्य कामेही करण्यात आल्याचे ते म्हणाले. आधीच पालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे त्या कर्मचार्यांकडून काम भागवले जात आहे, पालिकेच्या घंटागाड्या लवकरच येत असून त्यावर जीपीएस यंत्रणा लावली जाईल त्यामुळे नेमका कचरा कुठून उचलला जात आहे हे कळेल शिवाय ठेकेदारालाही जाब विचारता येईल व प्रश्न मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
विशेष सभेचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली आदींची उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक सातला स्वच्छतेचे प्रथम बक्षीस
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत शहरातील प्रभाग क्रमांक सातला प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. या प्रभागाच्या नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व नगरसेवक मुकेश पाटील यांचे कौतुक करण्यात आले. 60 लाखांचा निधी प्रभागात विकासकामे करण्यासाठी देण्यात येणार आहे.