भुसावळ : भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यास शिविगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणार्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पुंडलिक दगडू सूर्यवंशी (52, रा.हिरानगर, भुसावळ) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तथा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश पाटील हे शनिवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीजवळ कर्तव्यावर असताना संशयीत आरोपी सूर्यवंशी हे प्लॅटीना दुचाकी येत असताना त्यांना थांबवण्यात आले व लायसन्सची विचारणा केली असता त्यांनी लायसन्स दाखवले मात्र त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने कर्मचारी पाटील यांनी त्याबाबत दंडाची पावती दिली. याचा सूर्यवंशी यांना राग आल्याने त्यांनी पोलीस कर्मचार्यास शिविगाळ करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत गोंधळ निर्माण केला. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी सूर्यवंशी यांना अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.