भुसावळ शहर विकासाचा निरंतर ध्यास

0

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे ; शहरात चार नूतन उद्यानांची निर्मिती, सोयी-सुविधा पुरवण्यावर भर

भुसावळ- शहर विकासाचा निरंतर ध्यास असून भुसावळकरांना दिलेले प्रत्येक आश्‍वासन निश्‍चितच पूर्ण करणार असून शहरात विकासाची घौडदोड कायम राहील, असा विश्‍वास लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘दैनिक जनशक्ती’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलखुलास चर्चा केली. नगराध्यक्ष म्हणाले की, सत्तेनंतरच्या दोन वर्षांच्या काळात सुरूवातीला पथदिव्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला तर आता सात वर्ष गॅरंटीचे एलईडी दिवे लावण्यात आल्याने शहर दिव्यांनी उजळले आहे. केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना अमृतचे काम जोमात सुरू असून आठ ठिकाणी जलकुंभांच्या उभारणीसह सुमारे 125 किलोमीटरच्या परीघात पाईप लाईन अंथरण्यात आली आहे.

दोन महिन्यांच्या आत घनकचरा प्रकल्पाचे काम मार्गी लागणार ; चार नवीन उद्याने
नगराध्यक्ष भोळे यांनी दोन वर्षांच्या काळातील कामांबाबत माहिती देताना सांगितले की, शहरात सुरुवातीला गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत अडचण येत असल्याने गटारींच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, अनेक ठिकाणी ढापे बसवण्यात आले. अमृत योजनेमुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला असलातरी शहरवासीयांच्या नियमित वापर असलेल्या मामाजी टॉकीज रस्त्याचे ट्रीमीक्स काँक्रिटीकरण आले. लवकरच शहरातील कॉलन्यांसह प्रमुख रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात येणार असून दोन ते तीन महिन्यांच्या आत घनकचरा प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याबाबत भर राहणार आहे. शहरातील प्रभागातून निघणारा कचरा संकलनासाठी 25 घंटागाड्या सुरू करण्यात आल्या असून पालिकेच्या स्वःमालकिच्या या गाड्यांवर जीपीएस सिस्टीम लावण्यात आल्यामुळे गाडीचे लोकेशन कळणार असून तक्रारी सोडवताना मोठी मदत होणार आहे. शहरातील नागरीकांसाठी स्वतंत्र प्रशस्त चार उद्यानांची निर्मिती सुरू असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. शहरातील प्रभात कॉलनीजवळ सर्वाधिक प्रशस्त उद्यानाची उभारणी होत असून त्यासोबतच गणेश कॉलनी, हनुमान नगर, वांजोळा रोड तसेच विकास कॉलनीत उद्यानांचे काम प्रगती पथावर सुरू आहे. शहरातील काहींनी मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने या जागांवर आता त्या भागातील नागरीकांसाठी छोट्या स्वरूपाचे प्ले एरीया कम गार्डन पाच ते सहा ठिकाणी उभारण्यात आले असून अन्य ठिकाणीदेखील त्याच पद्धत्तीने कामांना सुरुवात करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेल्या वेळोवेळच्या सूचनेनुसार शहरात विकासकामे सुरू आहेत.

नागरीकांचे सहकार्य देखील अपेक्षीत
नगराध्यक्ष भोळे म्हणाले की, भुसावळ शहर विकासासाठी माझ्यासह माझे सर्व भाजपातील सहकारी नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. नगराध्यक्ष पदावर काम करीत असताना सोयी-सुविधा पुरवण्यावर आपला भर असून नागरीकांचे अनमोल सहकार्यदेखील आपल्याला अपेक्षित आहे. काही समाजकंटकांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात असल्याने त्याबाबतची माहिती त्यांनी निसंकोचपणे आपल्याला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. भुसावळच्या विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध राहू, अशी ग्वाही यानिमित्त शहरवासीयांना मी देतो, असेही ते म्हणाले.