2002 च्या प्रस्तावानंतर नगरविकास विभागाच्या मुख्य प्रधान सचिवांच्या आदेशाने पुन्हा सादर केला प्रस्ताव ; 35 किलोपर्यंत भाग समाविष्ट करण्याचे पालिकेला अधिकार ; हद्दवाढीनंतर मिळणार सुविधा
भुसावळ- शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या कॉलनीसह गावठाण परीसर पालिका हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती तर 2002 मध्ये पालिकेने प्रस्ताव पाठवल्यानंतरही त्याबाबत पाठपुरावा न झाल्याने पालिकेने 17 वर्षांनंतर पुन्हा याबाबतचा प्रस्ताव तयार करून नगरसविकास विभागाकडे पाठवला आहे तर सोमवारी याबाबत विशेष सभेत हद्दवाढीच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. दरम्यान, पालिकेला 35 किलोमीटरच्या परीघात हद्दवाढीचे अधिकार आहेत तर हा भाग पालिका हद्दीत समाविष्ट झाल्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच नागरीकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
2002 मध्ये पाठवला होता प्रस्ताव
यापूर्वी पालिकेने 2002 मध्ये भुसावळ शहर हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला होता मात्र त्याबाबत योग्य तो पाठपुरावा न झाल्याने फेर प्रस्ताव 5 फेबु्रवारीच्या आत पाठवण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या मुख्य प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी याबाबत विशेष सभा घेण्यात आली. पालिका सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींची उपस्थिती होती. सभेत केवळ एकच हद्दवाढीचा विषय असल्याने पाच मिनिटात या विषयाला मंजुरी मिळाली.
गावठाणही परीसराचा व्हावा समावेश -युवराज लोणारी
सत्ताधारी युवराज लोणारी यांनी ग्रामपंचायत हद्दीत न येणारा गावठाण भागही हद्दवाढीत जोडून घ्यावा, अशी सूचना मांडली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी उपोषणाच्या मात्रेनंतर सत्ताधार्यांना जाग आल्याचा आरोप केला तर विकासकामांचे श्रेय कुणीही घ्यावे मात्र हा तसा विषय नसल्याचे सांगितले.
हा भाग होवू शकतो समाविष्ट
जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलजवळील नदीजवळील परीसर, जळगाव रोडवरील साकेगाव गावाच्या हद्दीजवळील क्रेशर मशीनपर्यंतचा भाग, आरपीडी रोडवरील लिंम्पस क्लब, झोपडपट्टीपर्यंत, वरणगाव रोडचा विचार दीपनगर उड्डाणपुलापर्यंत (निंभोरा व दीपनगर ग्रामपंचायत सोडून) आदी भाग पालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावात येवू शकतो.
मूलभूत सुविधा पुरवता येणार -नगराध्यक्ष
2002 मध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र त्याचा पाठपुरावा घेण्यात न आल्याने पुन्हा फेर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पालिका हद्दीला लागून असलेल्या भागात रस्ते, पाणी, गटारी आदी मूलभूत सुविधा पुरवता येणार आहेत, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.
तर ही चूक सत्ताधार्यांना पडू शकते महाग
नगरपालिकेला 35 किलोमीटरपर्यंतचा भागात हद्दवाढीचा अधिकार आहे मात्र तसे केल्यास तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट होवून ग्रामपंचायती बरखास्त होतील शिवाय यामुळे ग्रामपंचायत कर भरणार्या नागरीकांना पालिकेच्या वाढीव कराचा भूर्दंड सोसावा लागेल शिवाय स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्यांची नाराजीदेखील ओढवली जाणार असल्याने सत्ताधारी भाजपाला ही चूक महागात पडू शकते त्यामुळे आजमितीला शहराला लागून असलेल्या 13 किलोमीटरपर्यंतच्या भागातच हद्दवाढ होण्याची शक्यता आहे.