प्रांताधिकार्यांना निवेदन ; शहरात मूलभूल सुविधा नसताना ग्रामीण भागात काय सेवा देणार ?
भुसावळ- भुसावळ पालिकेच्या प्रस्तावीत हद्दवाढीला राष्ट्रवादी काँग्रेससह चोरवड, खेडी, साकेगाव, खडका ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंचांनी लेखी विरोध करीत प्रांताधिकारी प्रशासनाला शनिवारी निवेदन दिले. भुसावळ शहरातच पालिका मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सक्षम नसताना ग्रामीण भागाचा शहरात समावेश करून सुविधा पुरवल्या जाणार तरी कशा ? असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
ग्रामीण भागातून हद्दवाढीला विरोध
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, भुसावळ पालिका आजघडीला 15 ते 20 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करते तर शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून अमृत योजनाही बारगळली आहे शिवाय सर्वत्र गावभरात कचर्याचे ढीग साचले आहेत त्यामुळे भुसावकरांना पालिका धड सुविधा देत नसताना ग्रामीण भागाची हद्दवाढ करून ग्रामीण भागातील दुष्काळी जनतेला नेमक्या काय सुविधा पुरवणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून हद्दवाढ झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना करवाढीचा बोजा सोसावा लागेल त्यामुळे हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदनात नमूद आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर साकेगाव उपसरपंच शकील पटेल, विजय पाटील, निवृत्ती पवार, प्रवीण पवार, शिवपूर-कन्हाळे सरपंच राजेंद्र पाटील, कंडारी ग्रामपंचायत सदस्य विनायक वासनिक, जि.प.चे माजी सदस्य विजय अवसरमल, शेतकी संघ सभापती पंढरीनाथ पाटील, चोरवड-खेडी ग्रामपंचायतीचे सरपंच रेखा प्रवीण गुंजाळ, उपसरपंच जयाबाई मेहरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ तसेच खडक्याचे शेख तस्लम, शहेनाज बी.सलीम अहमद, मोहसीन खान मोहमद खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.