भुसावळ- पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयाची टारगटांनी तोडफोड केल्यानंतर शहर पोलिसांनी धाव घेत या प्रकरणी संशयीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी मध्यरात्री समाज कंटकांनी साहित्याची तोडफोड करीत कार्यालयाच्या आवारातील व्हरांड्यातर संगणकाचे मॉनेटर फोडले होते तर अधिकार्यांच्या टेबलावर शौचविधी केल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला होता.
पालिकेची मालमत्ता शहरात असुरक्षित
या घटनेची दखल नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व पालिका पदाधिकार्यांनी घेतली आहे. वांजोळा रोडवरील दुरुस्ती केलेली पाईपलाइन फोडणे, खडका रोडवरील आरोग्य उपकेंद्राचे कुलूप तोडून नासधुस केल्यानंतर महिन्याभरात घडलेला हा तिसरा प्रकार आहे. यामुळे आता पालिका मालमत्ता असुरक्षीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात 8 जून रोजी वांजोळा रोडवर मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात तरुणाने दुरुस्तीनंतर तपासणीसाठी उघड्या ठेवल्या खड्ड्यातील पाईप लाईन फोडली होती. या प्रकाराचे एका व्यक्तीने चित्रीकरण केले होते. यानंतर 15 जून रोजी खडका रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही टेबल, खुर्चा, तावदान फोडून नुकसान केले होते मात्र अद्यापही पोलिसांकडून कारवाइॅ झालेली नाही.
शिक्षण मंडळ कार्यालयाची पाहणी
नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी लिपिक नीलेश पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व त्याच्या सहकार्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात जाऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली तर गुप्त बातमीदारांतर्फे संशयीतांचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले.