भुसावळ सत्ताधारी नगराध्यक्ष व भाजपा गटनेता ‘भिडले’

0

भुसावळ पालिकेच्या सभेनंतर विकासकामांवरून उभयंतांमध्ये वादंग ; शहरात पोळ्याला नव्या राजकीय समीकरणांची ‘नांदी’

भुसावळ : भुसावळ पालिकेची रस्ता कामांबाबतची विशेष सभा आटोपल्यानंतर नगराध्यक्षांच्या कक्षाजवळील विश्रामकक्षात नगराध्यक्ष व गटनेत्यांमध्ये विकासकामांच्या विषयांवरून वादंग झाल्याने दोघे एकमेकांवर धावून गेले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी या वादात मध्यस्थी करीत दोघांना बाजूला केल्याने मोठी अप्रिय घटना टळली मात्र सत्ताधार्‍यांमधील सुंदोपसुंदी मात्र आता उघड झाली आहे. शहरात सोशल मिडीयावरही या वादाबाबत पोस्ट व्हायरल झाल्याने सत्ताधारी मात्र नागरीकांकडून ट्रोल होताना दिसून आले. प्रसिद्धी माध्यमांना मात्र उभयंतानी कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

सत्ताधार्‍यांमधील वाद नव्या राजकारणाची ‘नांदी’
शुक्रवारी पालिकेच्या आयोजित विशेष सभेत शहरातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनाशेजारी असलेल्या बैठक हॉलमध्ये सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली व नगराध्यक्ष रमण भोळे बसले असताना एकमेकांकडे दोघांनी टाकलेल्या कटाक्षानंतर तेली यांनी मला सभागृहात बोलू दिले नाही, असे सांगताच उभयंतामध्ये वादाची ठिकाणी पडली. दोघही एकमेकांसमोर धावून आले मात्र याचवेळी नगरसेवक मनोज बियाणी, रवींद्र खरात, राजीव पारीख, वसंत पाटील, मुकेश गुंजाळ यांनी हा वाद सोडवत उभयंतांना बाजूला नेले. यापूर्वीदेखील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष व नगरसेवक युवराज लोणारी यांच्यात विकासकामांवरून खडाजंगी झाली होती.

सत्ताधार्‍यांनीच फोडला पोळा
शुक्रवारी पोळा सणाची शहरात धामधूम सुरू असताना नगराध्यक्ष रमण भोळे व भाजपा गटनेता मुन्ना तेली यांच्यात विकास कामांवरून झालेल्या हमरीतुमरीची शहरभर चांगलीच चर्चा रंगली. पालिकेत भाजपाची सत्ता असलीतरी आमदार सावकारे व माजी मंत्री खडसे यांना मानणारे दोन गट आहेत त्यामुळे या गटांमध्ये अधून-मधून होत असलेल्या कुरबुरी शहरवासीयांनी पाहिल्या मात्र आता सत्ताधार्‍यांनी उघडपणे षड्डू ठोकल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे फटके तर नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

विकासकामांची विचारणा -गटनेता
गटनेता मुन्ना तेली यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, विकासकामांसंदर्भात नगराध्यक्षांना विचारणा केली, कुठलेही वाद आमच्यात झालेले नाहीत. जेथे डांबरीकरण होणार नाही त्या भागात आयपीएस वा पेव्हर ब्लॉक बसवण्याची आपण मागणी केल्याचे ते म्हणाले.

इथे जोरात बोलण्याची पद्धत -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्यात कुठलेही वादंग झाले नाहीत. विकासासंदर्भात बोलणे सुरू होते मात्र इथे जोरात बोलण्याची पद्धत असल्याचेही ते म्हणाले.

सभेपूर्वीच मुख्याधिकारी परतल्या माघारी
शुक्रवारी पालिका सभा असताना पावणे अकरा वाजता मुख्याधिकारी करुणा डहाळे या पालिकेत पाय ठेवणार तोच काही नगरसेवकांकडून बिले मंजूर होत नसल्याने वादंग सुरू होते तर वादाची ठिणगी पडणार असल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी माघारी वळल्याने सत्ताधार्‍यांमधील कलगीतुरा शहरवासीयांसाठी चर्चेचा ठरला आहे.