भुसावळ-सुरत बस बंद : प्रवाशांची प्रचंड गैरसोय

0

भुसावळ- मुसळधार पावसामुळे नवापूर गावाजवळील पुलाचा भराव वाहून गेल्याने भुसावळ ते नवापूर बसेस गेल्या तीन दिवसांपासून बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बस ऐवजी प्रवाशांनी रेल्वेने प्रवासाला पसंती दिल्याने रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून भुसावळ आगारातून सुरतसाठी सोडल्या जाणार्‍या दोन बसेस केवळ साक्रीपर्यंतच जात आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचा मार्ग बदलावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. भुसावळहून-सुरत जाण्यासाठी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आणि दुपारी 4.30 वाजता बस सोडली जाते. मात्र, या बसेस साक्रीपर्यंतच जात असल्याने पुढील प्रवासात प्रवाशांंची गैरसोय होते. पर्याय म्हणून भुसावळ आगाराच्या बसेस नंदुरबारमार्गे सुरतकडे वळवता येणे शक्य आहे. आगारप्रमुखांनी दखल घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी अपेक्षा आहे.