भुसावळ स्टेशनरोडचे काम होणार

भुसावळ – स्टेशनरोडच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली असून, २० जानेवारीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. याबाबत शहरातून तक्रारी केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने लेखी स्वरुपात ही माहिती दिली आहे.

शहरातील अमर स्टोअर्स ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा स्टेशनरोड अखेरची घटका मोजत होता. या प्रकरणी ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेवक निर्मल कोठारी, भुसावळ परिवर्तन मंचचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, व्यापारी विनोद जैन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी यांनीही रेल्वे प्रशासनाकडे रस्त्याची समस्या मांडली होती. या तक्रारदारांना रेल्वे विभागाने लेखी स्वरुपात माहिती दिली आहे. पालिकेने निधी वर्ग न करताच या रस्त्याची दुरुस्ती होत आहे. सध्या बीबीएम अर्थात खडीकरण पूर्ण झाले असून क्युरिंगनंतर सिलकोट व कारपेटची कामे केली जाणार आहेत. दीर्घकाळानंतर स्टेशनरोडची रया बदलणार असल्याने, दिलासा मिळणार आहे.

काँक्रिटीकरणच हवे

स्टेशनरोडवर वाहनांचा वावर जास्त आहे. बसस्थानकासमोर एसटी बसेस वळण घेवून बसस्थानकात प्रवेश करतात, यामुळे या ठिकाणी भलामोठा खड्डा निर्माण होतो. पावसाळ्यात पाणी साचून वारंवार रस्ता खराब होतो. ही समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या मागणीचा विचार करावा.