लाभार्थींचे हाल न होण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी
भुसावळ : शहरातील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 12 या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला असून नागरीकांचे आता स्वस्त धान्यासाठी हाल न होण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.
धान्यात तफावत आळढल्याने परवाना रद्द
जळगाव रोड परीसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परीसरातील शिधापत्रिका धारकांना 11 व 12 एप्रिल रोजी धान्य मिळाले होते परंतु जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या काळात धान्याचा अपहार झाल्याच्या संशयावरून या भागातील स्वस्त धान्य दुकानदार संतोष भालचंद्र लोखंडे आणि गौरव प्रभाकर धर्माधिकारी यांच्याविरूध्द पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय या दुकानदाराचा परवानादेखील रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, हा परवाना रद्द झाल्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थीं व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यास असुविधा होणार आहे. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासनाने या लाभार्थ्यांना त्वरत त्याच भागातील अन्य दुकानामध्ये धान्य वितरीत करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याकडे केली आहे. सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, आसपासच्या दुकानात ग्राहकांची व्यवस्था केली जाईल, पात्र लाभार्थींना धान्य मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असे आश्वासन पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी दिले आहे.