भूखंड माफियाविरोधात महिन्याभरात गुन्हे नोंदवा

0

धुळे : शहरातील 501, 510 सर्व्हेनंबरच्या शासकीय जमिनीवर स्वत:चे नाव लावून घेत शासनाला 135 कोटी रुपयांचा चुना लावणार्‍या भूखंड माफियांविरोधात महिनाभरात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत दिले. या प्रकरणी आ. अनिल गोटे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. धुळे शहरातील सरकारी मालकीचा सर्व्हे नं. 501 व 510 अ ब क ड यातील 135 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दि. 27 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या अहवालातील शिफारशीनुसार एक महिन्याच्या आत जबाबदारी निश्‍चित करुन फौजदारी स्वरुपाची तसेच शासकीय पातळीवरील कठोर कारवाई केली जाईल. धुळे शहरातील सरकारी मालकीचा सर्व्हे नं. 501 व 510 अ ब क ड यातील 135 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आ. गोटे रांनी आवाज उठविला आहे.

राज्यभरातील शासकीय जमिनींचा दुरूपयोग
आ. अनिल गोटे यांनी केलेली तक्रार खरी असून निष्कर्ष अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. हा एकट्या धुळे शहराचा प्रश्‍न नसून राज्यभरात अशा पद्धतीने शासकीय जमिनीचा कोणी कोणी दुरुपयोग केला याची संपूर्ण माहिती पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, असेही महसूलमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. महसूल अधिकार्‍यांच्या सहभागाने सरकारी जमिनीवर स्वत:च्या नावाने 7/12 उतार्‍यावर नोंद करुन घेण्याचे उघडकीस आलेल्या 501 व 510 मधील 13 कोटी 50 लाख रुपयांचे मंजूर झालेल्या निवाड्याची रक्कम दिली जाणार नसल्याचे सभागृहात ना.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.