भूखंड मिळवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी सतराजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई  – बोगस कागदपत्रांच्या आधारे भूखंड मिळवून राज्य शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी सतराजणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह काही शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्याने त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. इतर आरोपींमध्ये तुलसी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत जगन्नाथ सावंत, सेके्रटरी मुन्ना अब्दुल सय्यद, सभासद अजीत वसंत वळुंज, तुकाराम गोविंद पारकर, खाजगी मयत इसम संजय पराडकर, म्हाडाचे तत्कालिन सदस्य ताजुद्दीन मकदूमअली मुजाहिद, तत्कालिन भूमापक शिरीष मनोहर शृंगारपुरे, सहाय्यक भूव्यवस्थापक सूर्यकांत शंकरराव देशमुख, म्हाडाचे तत्कालिन अधिकारी सुरेश कारांडे, म्हाडाचे तत्कालिन सह मुख्य अधिकारी संजयसिंग गोपाळसिंग गौतम, म्हाडाचे मुख्य अधिकारी आणि तत्कालिन उपाध्याक्ष उत्तम पत्रोजी खोब्रागडे, तत्कालिन मुख्य अधिकारी सुभाष ओमाना सोनावणे, म्हाडाचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ दिपक मंडलेकर (मयत), भावेश बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असलेले समीर आणि पंकज भुजबळ यांचा समावेश आहे. यातील सहा आरोपींनी महाराष्ट्र शासनाकडे बोगस कागदपत्रांच्या आधारे भूखंड मिळविला होता. त्यासाठी वेळोवेळीसाक्षीदारांच्या नावाने बोगस स्वाक्षर्‍या करुन बोगस दस्तावेज तयार केले होते. त्याआधारे त्यांनी तुळशी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावाची खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती.

या संस्थेची तसेच त्यांनी सादर केलेल्या कुठलीही शहानिशा न करता त्यांना शासनाकडून भूखंड देण्यात आला होता. या भूखंडामध्ये त्यांनी अनिवासी वापरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले होते. या कटात काही शासकीय अधिकारी, समीर आणि पंकज भुजबळ यांचाही मावेश होता. अशा प्रकारे या आरोपींनी शासनाकडून भूखंड मिळवून त्याचा स्वतचा फायद्यासाठी वापर करुन साक्षीदारासह शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या सतरा आरोपीविरुद्ध 409, 420, 465, 466, 467, 471 सह 34, 109, 120 ब भादवी सहकलम 13 एक, क, 13 एक, ड, सहकलम 13 दोन भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नाही. चौकशी सुरु असून लवकरच संबंधित आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.